२४ तासांत ८१ मृत्यू; ३,८२७ रुग्णांची भर

नागपूर: जिल्ह्य़ात २४ तासांत ८१ करोना रुग्णांचा मृत्यू तर ३ हजार ८२७ नवीन रुग्णांची भर पडली. यावरून रुग्णसंख्येचा उद्रेक ओसरताना दिसत आहे. विशेष म्हणजे, शनिवारी २४ तासांत  आढळलेल्या नवीन रुग्णांच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक व्यक्ती करोनामुक्त झाले.

दिवसभऱ्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २ हजार १६, ग्रामीणचे १ हजार ७९७, जिल्ह्य़ाबाहेरील १४ अशा एकूण ३ हजार ८२७ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ३ लाख १६ हजार २९५, ग्रामीण १ लाख २८ हजार ३४०, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ३३६ अशी एकूण जिल्ह्य़ात ४ लाख ४५ हजार ९७१ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभऱ्यात शहरात ५१, ग्रामीण १६, जिल्ह्य़ाबाहेरील १४ अशा एकूण  ८१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ४ हजार ८७४, ग्रामीण २ हजार ४१, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार १५४ अशी एकूण जिल्हात ८ हजार ६९ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभऱ्यात शहरात ४ हजार ७५९, ग्रामीण ३ हजार ४० असे एकूण जिल्ह्य़ात ७ हजार ७९९ व्यक्ती करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख ८० हजार ४५०, ग्रामीण ९९ हजार २०७ अशी एकूण जिल्ह्य़ात ३ लाख ७९ हजार ६५७ व्यक्तींवर पोहोचली आहे. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत हे करोनामुक्तांचे प्रमाण ८५.१३ टक्के आहे.

विदर्भात रुग्णसंख्या घटली; पण मृत्यूंत वाढ!

विदर्भातील अकरा जिल्ह्य़ांत २४ तासांमध्ये २४१ करोना रुग्णांचा मृत्यू तर ११ हजार १३६ नवीन रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली. दरम्यान शहरात नवीन रुग्णसंख्या एकीकडे कमी होत असतांनाच दुसरीकडे  मृत्यू वाढत असल्याने चिंता वाढली आहे. विदर्भात ५ मे रोजी २५७ मृत्यू झाले होते. त्यापूर्वी ही संख्या कमी होत होती.  ६ मे रोजी पुन्हा  २०६ मृत्यू झाले. आज ८ मे रोजी पुन्हा मृत्यूसंख्या वाढून २४१ नोंदवली गेली.   शनिवारी दिवसभरात नागपूर शहरात ५१, ग्रामीण १६, जिल्ह्य़ाबाहेरील १४, अशा एकूण  ८१ रुग्णांचा मृत्यू झाला. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील ३३.६० टक्केमृत्यूंचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्य़ात २४ तासांत ३ हजार ८२७ नवीन रुग्णांची भर पडली.   भंडाऱ्यात १२ रुग्णांचा मृत्यू तर ५४८ रुग्ण, अमरावतीत १९ मृत्यू तर १ हजार २४१ नवीन रुग्ण, चंद्रपूरला २१ मृत्यू तर १ हजार १६० रुग्ण, गडचिरोलीत २२ मृत्यू तर ४३१ रुग्ण, गोंदियात ७ मृत्यू तर ३१० रुग्ण, यवतमाळला २० मृत्यू तर ८४१ रुग्ण, वाशीमला १ मृत्यू तर ४९१ रुग्ण, अकोल्यात २२ मृत्यू तर ५२३ रुग्ण, बुलढाण्यात ९ मृत्यू तर ९५७ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात २७ मृत्यू तर ८०७ नवीन रुग्ण आढळले.

दीक्षाभूमीत ३० खाटांचे करोना काळजी केंद्र

दीक्षाभूमी परिसरात उद्या, रविवारपासून करोना काळजी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. २४ तास निशुल्क हे केंद्र सुरू राहणार आहे.  या केंद्रात १५ प्राणवायू  खाटा आणि आणि १५ विलगीकरण खाटा उपलब्ध आहेत. या केंद्राचे उदघाटन उद्या रविवारला सकाळी १० वाजता पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ज्या करोना रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत आणि प्राणवायूची गरज आहे अशा नागरिकांनी या करोना काळजी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी केले आहे.

शनिवारी १६९ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा

ओडिशातून ५८ मे.टन प्राणवायू, ३,८६७ रेमडेसिविर मिळाले. प्राणवायूचे चार टॅकर ओडिशातून रेल्वे मार्गाने नागपुरात दाखल  झाले. या माध्यमातून ५८ मेट्रिक टन  प्राणवायूचा अतिरिक्त पुरवठा शनिवारी झाला. यासह एकूण १६९ मेट्रिक टन प्राणवायू नागपूरला मिळाला.    याशिवाय नागपूर  जिल्ह्य़ासाठी शनिवारी ३ हजार ८६७ रेमडेसिवीर प्राप्त  झाले. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार सर्व मागणी करणाऱ्या रुग्णालयांना त्यांचे वितरण केले जाणार आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या ६० हजारांहून खाली

करोनाच्या उद्रेकानंतर अनेक आठवडय़ाने जिल्ह्य़ातील सक्रिय रुग्णांची संख्या ६० हजारांहून खाली घसरली आहे. शनिवारी शहरात ३१ हजार २२८, ग्रामीण २७ हजार १७ अशा एकूण  ५८ हजार २४५  रुग्ण नोंदवले गेले. त्यातील ५० हजार ५१५ रुग्णांवर गृह विलगीकरणात तर गंभीर संवर्गातील ७ हजार ७३० रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

 ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू राहणार

राज्य शासनाच्या कोटयातून लसीचा साठा प्राप्त झाल्यामुळे शहरातील  एकूण ९६ केंद्रांवर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. यामध्ये इंदीरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय  व अ.भा. आर्युविज्ञान संस्था मध्ये कोव्हिशिल्ड दिले जाईल.  शासकीय व महापालिकेच्या ९६ केंद्रांवर ४५ वर्षांंवरील नागरिकांचे लसीकरण रविवारी८ मे ला करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

आपत्ती निवारण दल निधीतून ५० रुग्णवाहिका मंजूर 

आमदार विकास ठाकरे यांनी ५० रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी करताच राज्य सरकारने राज्य आपत्ती निवारण दल निधीतून ५० रुग्णवाहिका तातडीने मंजुर केल्या आहेत. आपत्ती, मदत व पुनर्वसन मंत्री  विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ या संदर्भात ठाकरे यांना पत्र दिले. ठाकरे यांनी शहरातील १० झोनमधील रुग्णांची संख्या करोना केंद्र, शासकीय रुग्णालय, रुग्णवाहिका व शववाहिकाबाबत वडेट्टीवार यांना माहिती दिली होती.  या रुग्णवाहिका शहरात आल्यावर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

सकारात्मक अहवालाचे प्रमाणही घसरले

शहरात दिवसभऱ्यात १४ हजार ७५६, ग्रामीण ५ हजार ४७९ अशा एकूण जिल्ह्य़ात २० हजार २३५ चाचण्या झाल्या. त्यांचे अहवाल रविवारी अपेक्षित आहेत. परंतु शुक्रवारी तपासलेल्या जिल्ह्य़ातील २२ हजार २९८ नमुन्यांमध्ये ३ हजार ८२७ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. त्यामुळे सकारात्मक अहवालाचे प्रमाण अनेक दिवसांनी घसरून १७.१६ टक्के नोंदवले गेले.