नामांकित कंपन्यांच्या नाममुद्रेचा बेकायदा वापर  

क्रीडा साहित्य निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपन्यांच्या नाममुद्रे (लोगो) सारख्याच हुबेहूब दिसणाऱ्या नाममुद्रेचा वापर करून बनावट क्रीडा साहित्यांची शहरात सर्रास विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे, हे साहित्य केवळ छोटय़ा दुकानातच नाही तर मोठय़ा दुकानात सुद्धा सहज उपलब्ध आहे. यातून क्रीडापटूंची फसवणूक होत आहे.

क्रिकेटसह इतरही क्रीडा प्रकारांच्या विविध स्पर्धाचा हंगाम सुरू आहे. शाळा, महाविद्यालय तसेच क्लब आणि खासगी कंपन्यांच्या स्पर्धा होत आहेत. त्यामुळे क्रीडा साहित्यांची मागणी वाढली आहे. क्रिकेट, फुटबॉल, बॅडिमटन, हॉकीसह इतर अनेक खेळासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी ग्राहकांची दुकानांमध्ये गर्दी झालेली आहे. याचा गैरफायदा विक्रेते घेत असून ग्राहकांच्या माथी बनावट साहित्य मारले जात आहेत. नामांकित कंपन्यांच्या साहित्याला विशेष मागणी असते. त्यांचे दरही चढे आहेत.

ते सर्वसामान्यांना परवडणारे नसतात. मात्र, काही विक्रेते त्याच कंपनीचे हूबेहूब दिसणारे साहित्य विकून ग्राकांची फसवणूक करीत आहेत. यामध्ये खेळासाठी लागणारे विविध प्रकारचे जोडे, ड्राय फिट टी-शर्ट, किट बॅग, ट्रकसूट, बॅट्स, फुटबॉल, क्रिकेटचे साहित्य आदींचा समावेश आहे. बनावट साहित्य हुबेहूब मूळ कंपन्यांच्या साहित्यासारखे तयार केले जात असल्याने प्रथमदर्शनी ग्राहकांच्याही ही बाब लक्षात येत नाही. शिवाय त्याला चिटकवण्यात येणारे किंमतीचे स्टीकर्स देखील बनावट असते. अधिकृत विक्रेत्यांकडे असणाऱ्या साहित्याच्या किंमतीच्या तुलनेत बनावट साहित्याच्या किंमती निम्म्या असतात. मूळ कंपनीचा ‘ड्राय फिट टीशर्ट’ अधिकृत विक्रेत्यांकडे तीन हजाराचा मिळतो. ती इतर ठिकाणी केवळ एक हजारत उपलब्ध आहे. इतरही क्रीडा साहित्याच्या किंमतीतील असाच फरक आहे.

हरियाणा, लुधियाना येथून सर्व साहित्य देशाच्या विविध भागात वितरित केले जाते. ते ‘फर्स्ट कॉपी’च्या नावाखाली सर्रास विकले जात आहे. मात्र, मुलांना आणि पालकांना याची जाण नसल्याने त्यांनी फसवणूक होत आहे. प्युमा, रिबॉक, नाइके, स्पीडो, ऑक्ले, अ‍ॅडिडास, एसजी आदी कंपन्यांच्या नाममुद्रेचा वापर बनावटी साहित्य निर्मिती करणारे करीत आहेत.

बाजारात बनावटी क्रीडा साहित्य विकले जाते, अशी तक्रार आम्ही अनेकदा संबंधित कंपन्यांकडे केली आहे. मात्र, कंपन्यांकडून थंड प्रतिसाद मिळाला. नुकतेच मेरठमध्ये एका बनावटी क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या कंपनीवर छापे टाकण्यात आले. मात्र, पूर्ण देशभरात सुरू असलेल्या अशाप्रकारच्या कंपन्यांचे काय? ऑनलाई मिळणारे साहित्य बनावटी मिळत आहे. नेव्हीया आणि कॉस्को कंपनीचे बनावटी फुटबॉलच्या तक्रारी आल्या आहेत.

-योगेश थडाणी, संचालक ,स्पोर्ट लिंक, बर्डी