हृदयरोग तज्ज्ञांच्या कार्यशाळेतील सूर

हृदयरोगाशी संबंधित बऱ्याच सूक्ष्म बाबी तपासण्यांअंतीही डॉक्टरांना दिसत नाहीत, परंतु आता नवीन तंत्रानुसार संबंधिताच्या हृदयाच्या हालचाली व्यायाम किंवा औषधांनी वाढवून त्यांच्या न दिसणाऱ्या हृदयरोगाचेही निदान इको तपासणीतून करणे शक्य झाले आहे. आता रोबोटच्या सहाय्याने हृदयरोगावर प्रभावी उपचार करता येऊ शकते, असा सूर हृदयरोग तज्ज्ञांच्या हॉटेल सेंटर पॉईंट येथे झालेल्या परिषदेत व्यक्त करण्यात आला.

कार्डियॉलाजीकल सोसायटी ऑफ इंडियाच्या विदर्भ शाखेतर्फे आयोजित दोन दिवसीय इको कार्यशाळेत हृदयरोग चिकित्सकांनी यावर प्रकाश टाकला. अमेरिकेतील मेयो क्लिनिकचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. के. चंद्रा म्हणाले, हृदयरोगाने शरीरात बरेच बदल घडतात. हृदयविकाराच्या धक्क्याने प्रसंगी हृदयक्रिया बंद पडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. वेळीच निदान करून ही जोखीम टाळता येते. पूर्वी हृदविकारानंतर ओपन हार्ट सर्जरी करून रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर केले जात होते. पण आज प्रगत झालेल्या तंत्राने हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोणत्या नलिकेत ब्लॉकेजेस आहेत, त्याचे प्रमाण किती आहे, यापासून ते उपचारापर्यंत सगळ्याच बाबी संगणकीकृत रोबोटच्या सहाय्याने करता येतात.

स्ट्रेन या अत्यंत प्रगत निदान तंत्राने हृदयाच्या आतील भागाचेही सूक्ष्म निरीक्षण करता येते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच हे बदल टिपता येतात. डॉ. शांतनू सेनगुप्ता म्हणाले, थ्रीडी, फोरडी इकोमुळे हृदयाला कमीत कमी चिरा वा हृदयाला न उघडताही निदानापासून ते उपचारापर्यंत आणि त्यानंतर रुग्णाचा वारंवार पाठपुरावा करण्यापर्यंत सगळ्याच बाबी तपासणे शक्य आहे. डॉ. सुनल्ीा वाशीमकर म्हणाले, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये निर्माण होणाऱ्या अडथळ्यांना अनेक बाबी कारणीभूत असतात. बदलती जीवनशैली, वेळी-अवेळी जेवण, कामाचा ताण, खाण्यापिण्याच्या सवयी, पुरेशा व्यायामाचा अभाव या बाबी हृदयविकाराला आमंत्रण देत आहेत. डॉ. प्रशांत जगताप म्हणाले, हृदयविकार येण्यापूर्वी आपले शरीर प्रतिक्रिया देत असते. हृदयाची ही स्पंदने टिपण्यासाठी ईसीजी हे अत्यंत सोपे आणि सहज उपलब्ध असणारे तंत्र आहे.

या तपासणीतून हृदयाचा कोणता भाग ताण सोसत आहे,  इथपासून ते रक्तवाहिन्यातील दोष कळू शकतो. त्यासाठी डॉक्टरांना इसीजीचे अचूक वाचन करता आले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.