अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून यंत्रणा विकसित

भारतात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यातही वाहनांची गती अधिक असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. वाहतूक दिव्यांकडे लक्ष नसल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळता येत नसल्या, तरीही वाहनाच्या गतीमुळे होणारे अपघात नक्कीच टाळता येऊ शकतात. ही गोष्ट लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंट वेहिकल स्पीड कंट्रोल सिस्टम’ ही यंत्रणा तयार केली आहे. या यंत्रणेने वाहतूक विभागाला देखील प्रभावित केले आहे.

विदेशात वाहतुकीचे नियम पाळले जातात. त्यामुळे त्याठिकाणी अपघातांचे प्रमाण कमी आहे. भारतात याउलट चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक व टेक्नॉलाजी कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या यंत्रणेत ट्रान्समीटर आणि रिसिव्हर अशा दोन प्रणाली बसवण्यात आल्या आहेत. ज्याद्वारे लाल आणि पिवळ्या दिव्यांची स्थिती आधी ओळखली जाते. त्यानंतर वाहतुकीच्या दिव्यांजवळील वाहनांचा वेध घेतला जातो. वाहन जसजसे या वाहतूक दिव्याजवळ येते, तसे वाहन नियंत्रकांना माहिती दिली जाते. त्यानंतर वाहनांची गती आपोआप कमी होते. पिवळा दिवा लागल्यानंतर वाहनचालकाने कितीही प्रयत्न केला तरी या यंत्रणेमुळे वाहन समोर जातच नाही. यामुळे अपघाताचे प्रमाण

कमी होते. वायरलेस नियंत्रणाकरिता स्वयंचलित यंत्रणेत ते लागू केले जाऊ शकते. यात जीएसएम तंत्रज्ञानाचा वापर करून वाहनांचा मागोवा घेतला जाऊ शकतो.

वाहतूक दिव्यांच्या खांबांवर ट्रान्समीटर आणि वाहनांवर रिसिव्हर बसवले जाते. दुचाकी, चारचाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांवर ते लावले जाऊ शकते. विशेष म्हणजे, जुन्या वाहनांवरही ही यंत्रणा लावता येते. एवढेच नाही तर या यंत्रणेच्या माध्यमातून रेल्वेफाटकांवर होणारे अपघात देखील टाळता येतात. त्यात आणखी नवनवे शोध सुरू असून लवकरच पेटंट मिळवण्यासाठी देखील प्रयत्न करता येईल.

– सौरभ कोरे, अश्विन मून, कांचन हनवते