‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन २०१७’चे उद्घाटन

चुकीचे डिझाईन बनवल्यामुळे रस्त्यावरील ५० टक्के अपघाताला केवळ अभियंते जबाबदार असल्याचे वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन २०१७’च्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे बोलत होते. कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन त्यांच्या हस्ते आज सभागृहात पार पडले.

देशातील ख्यातनाम आयआयटी आणि एनआयटीचेच नव्हे तर मनुष्यबळ विकास मंत्रालय, एआयसीटीई, विद्यापीठ अनुदान आयोग व नेस्कॉम यासह अनेक सरकारी आणि निमसरकारी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयात आल्याबरोबर गडकरी तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गेले आणि त्याचठिकाणी त्यांनी स्मार्ट इंडिया हेकथॉनविषयी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. समस्यांच्या सोडवणुकीसाठी अशाप्रकारच्या कार्यक्रमांची गरज असल्याचे सांगून त्यांनी महाविद्यालयाला या कार्यक्रमाचे यजमानपद मिळाल्याबद्दल विशेष कौतुक केले.

यावेळी गडकरी म्हणाले, देशातील ३० टक्के चालक परवाने बनावट आहेत. यापुढे परवान्यांची ‘ई-गव्हर्नन्स’च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक नोंदणी करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) तीन दिवसांत परवाने देणे सक्तीचे करण्यात येणार आहे. एकदा परवाना घेतल्यानंतर तो कुठेही वैध राहील. त्यामुळे बनावट परवाने तयार करणाऱ्यांना आळा बसेल. गरीब असो की श्रीमंत प्रत्येकाला परवान्यांसाठी चाचणी द्यावीच लागेल, त्यामुळे घरबसल्या कुणालाही परवाने मिळणार नसल्याची माहितीही त्यांनी दिली. आजच्या शिक्षण पद्धतीवर गडकरी यांनी नेहमीप्रमाणे आसूड ओढत, देशातील ५० टक्के अपघात अभियंत्यांनी केलेल्या चुकीच्या कामांमुळे होतात, विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने योग्य शिक्षण घेतले तर असे अपघात टाळता येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. हॅकथॉन कार्यक्रमाचे नोडल अधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश पांडे यांनी हॅकथॉनविषयी माहिती दिली.