08 July 2020

News Flash

परप्रांतीय कामगारांना परत आणण्याची जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी – गडकरी

करोनामुळे सर्वच उद्योग, व्यवसायांवर व अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

नागपूर : परप्रांतीय कामगारांवर महाराष्ट्रातील उद्योग अवलंबून असल्याचे निर्माण केले जात असलेले चित्र खरे नाही. असे कामगार केवळ १० ते १२ टक्के आहेत. कामगारांना परत आणण्याची जबाबदारी उद्योजकांना घ्यावी लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गडकरींनी रविवारी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.

करोनामुळे सर्वच उद्योग, व्यवसायांवर व अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक देशात आणणे, आपले तंत्रज्ञान अधिक अद्ययावत करणे आणि जनतेची क्रयशक्ती वाढवणे हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या पदाधिकाऱ्यांनी या दृष्टीने विचार करावा. उद्योजकांनी उद्योग हळूहळू सुरू करावेत. गावी गेलेले कामगार पुन्हा येत असतील तर ते तेथील जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आणतील. ते येथील जिल्हाधिकाऱ्यांना दाखवावे लागेल. त्यांना आणण्याची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था उद्योजकांना करावी लागणार आहे, असे गडकरी म्हणाले.

आम्हाला करोनासारख्या आपत्तीचे रूपांतर इष्टापत्तीत करायचे आहे. त्यामुळे निराश होऊन चालणार नाही. करोना संकट व आर्थिक लढाई एकाच वेळी लढायची आहे. जोपर्यंत करोनावर औषध निघत नाही, तोपर्यंत करोनाचा प्रसार होणार नाही, या पद्धतीने नियम पाळून कामाला लागावे लागेल, असे गडकरी म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उत्पन्न दोन वर्षांत एक लाख कोटींनी वाढवण्याचे आम्ही ठरवले असल्याचे सांगताना ते म्हणाले की, पथकरातूनच आम्हाला यंदा २८ हजार कोटी मिळणार आहेत. पुढील वर्षी ते ४० हजार कोटी होतील. त्यामुळे लाख लाख कोटींचे उत्पन्न आम्ही गाठणार यात शंका नाही. आमचा प्रत्येक प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा सक्षम राहणार आहे. पीपीपी, बीओटी, डीओटीवर आम्ही काम करतोय. आता परकीय बँकेचे एक मोठे कर्ज आम्हाला मंजूर झाले आहे. अनेक वित्तीय संस्थांशी चर्चा सुरू आहे; पण बाजारात जोपर्यंत खेळता पैसा येणार नाही, सामान्यांची क्रयशक्ती वाढणार नाही, तोपर्यंत अर्थव्यवस्था पूर्वीसारखी होणार नाही. यासाठीच परकीय गुंतवणूक आणणे, आपले तंत्रज्ञान अद्ययावत करण्याचा विचार झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 3:04 am

Web Title: entrepreneurs should take responsibility for bringing back migrant workers nitin gadkari
Next Stories
1 गरिबांना धान्य संचाऐवजी ५ किलो तांदूळ
2 काळविटांच्या अधिवासावर अतिक्रमण
3 झणझणीत ‘सावजी’चा तोटाही कोटींच्या घरात
Just Now!
X