विदर्भात काँग्रेस आणि भाजप या दोनच मुख्य पक्षांना बऱ्यापैकी यश मिळाले असून, शिवसेना व राष्ट्रवादीला प्रभावक्षेत्राबाहेर विशेष कामगिरी बजाविता आलेली नाही.

विदर्भात ग्रामीण जनतेने दिलेला कौल हा सत्ताधारी महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपला तुल्यबळ ठरवणारा आणि जनतेला गृहीत न धरण्याचा सल्ला देणारा ठरला आहे.

विदर्भात (पूर्व विदर्भ १५०८, पश्चिम विदर्भ- २४४८) एकूण ३९५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस पक्षांना मिळालेला कौल हा समसमान असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांना त्यांच्या प्रभावक्षेत्राबाहेर विशेष कामगिरी बजावता आली नाही. आम आदमी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीने आपले खाते उघडले आहे. वंचितला नागपूर व अकोला जिल्ह्य़ात लक्षणीय जागा असल्या तरी संपूर्ण शहरी चेहरा असलेल्या ‘आप’ने ग्रामीण राजकारणात केलेला प्रवेश हा प्रस्थापित पक्षांना इशारा देणारा आहे.

नागपूर विभागात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात सपाटून मार खाणाऱ्या भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यामुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांच्या प्रयत्नाला या भागात यश मिळाल्याचे दिसून येते. नागपूर व वर्धा जिल्हा वगळता महाविकास आघाडी समर्थित गटांना विशेष यश मिळाले नाही. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्य़ांत भाजप समर्थित गटाने काँग्रेसच्या तुलनेत जास्त यश मिळवले.

नागपूर जिल्ह्य़ात गृहमंत्री अनिल देशमुख (राष्ट्रवादी) आणि पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार (काँग्रेस) यांनी त्यांच्या काटोल व सावनेर मतदारसंघात घवघवीत यश मिळवून दिले. पश्चिम विदर्भात अमरावती व यवतमाळ वगळता इतरत्र परिवर्तनाची लाट दिसून आली. अमरावतीत महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर (काँग्रेस) यांनी तर यवतमाळ जिल्ह्य़ात वनमंत्री संजय राठोड (सेना) यांनी यशस्वीरीत्या किल्ला लढवला. अकोला, वाशिम येथे संमिश्र निकाल आले. बुलढाण्यात राष्ट्रवादीचे नेते व मंत्री राजेंद्र शिंगणे व सेनेचे नेते प्रतापराव जाधव यांनी त्यांचे मतदारसंघ राखले. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने अकोल्याच्या बाहेर नागपूर जिल्ह्य़ात खाते उघडले. आम आदमी पार्टीने नागपूर जिल्ह्य़ातील कुही तालुक्यात कटारा-मुसळगाव ग्रा.पं.मध्ये नऊपैकी सहा जागा जिंकून प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का दिला.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भात महाविकास आघाडीला मिळालेले यश महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील यश हे पुढच्या निवडणुकांमधील विजयाची नांदी आहे, असे आम्ही मानतो.

– संदेश सिंगलकर, प्रवक्ते, शहर काँग्रेस.

महाराष्ट्रासह विदर्भात ग्रामीण जनतेने भाजपवर दाखवलेल्या विश्वासामुळेच पक्ष या निवडणुकीत पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या महाविकास आघाडीला ही सणसणीत चपराक आहे.

– गिरीश व्यास, प्रवक्ते, भाजप