देवेश गोंडाणे, नागपूर

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकारी आणि प्राध्यापक हे संगनमताने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी घेतलेल्या पगारी सुटय़ांची खोटी माहिती सादर करून शासनाची आर्थिक लूट करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका प्राध्यापकाने केवळ १५ दिवस मूल्यांकनाचे काम केले असताना विद्यापीठाच्या ‘स्पॉट व्हॅल्युएशन’ सेंटरच्या अधिकाऱ्याने मात्र त्यांना ४६ दिवस सेवा दिल्याचे कार्यमुक्त प्रमाणपत्र दिल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.

या प्रकरणात परीक्षा व मूल्यांकन संचालक डॉ. साबळे यांनी संबंधित प्राध्यापक व महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षांच्या मूल्यांकनासाठी संलग्नित महाविद्यालयांमधील प्राध्यापक परीक्षा भवन येथे येतात. ते पंधरा दिवस ते एक महिना मूल्यांकन करतात. या कालावधीत त्यांना महाविद्यालयांकडून पगारी रजा दिली जाते.  मूल्यांकनाचे मानधन विद्यापीठाकडून वेगळे मिळते. परंतु, विद्यापीठातील मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्यावर परीक्षेशी संबंधित विभागाकडून कार्यमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य असते. या पत्राच्या आधारे संबंधित प्राध्यापकाने महाविद्यालयात हजर न राहता विद्यापीठात मूल्यांकनाची सेवा दिली हे सिद्ध होते.

संबंधित प्राध्यापकाने कार्यमुक्त प्रमाणपत्रामध्ये स्वत:च्या हाताने तारखा टाकून विद्यापीठाच्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेतल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

– डॉ. प्रफुल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग.