वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आज गुरुवारी एका कारचालकाने सिग्नले मोडले. वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने कारचा क्रमांक मिळवला व त्याच्या घरी पोहोचून १ हजार २०० रुपयांचा दालान दिला. या तत्काळ कारवाईमुळे संबंधित व्यक्तीही स्तब्ध झाली व तिने ताबडतोब पोलिसांकडे चालानची रक्कम भरली.

आकाश बेनी रा. गोविंद गौरखेडे कॉम्प्लेंक्स, आकारनगर, सेमिनरी हिल्स असे कारचालकाचे नाव आहे. सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी ‘ट्राफिक क्रॅक टीम’ नावाने मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत काही पोलीस शिपाई रस्त्याच्या कडेला साध्या वेशात उभे राहतात व  सिग्नलचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करतात. या मोहिमेंतर्गत गेल्या तीन दिवसांमध्ये अनुक्रमे १६२, १७७ आणि २४० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. गुरुवारी एमएच-३१,एफई४९६१ क्रमांकाच्या कारने एका सिग्नलचे उल्लंघन केले. कारचालक पळून गेला. त्या चौकातील कर्मचाऱ्याने आपल्या विभागाला माहिती दिली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारचा क्रमांक मिळवला व त्या कार क्रमांकाच्या पत्त्यावर पोलीस पोहोचले. त्यानंतर संबंधिताला छायाचित्रे दाखवून १२०० रुपयांचा चालान दिला. त्यांनीही तो लगेच भरला. या कारवाईतून वाहनचालकांनी सिग्नल मोडताना धडा घेण्याची आवश्यकता आहे, असे मत पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी व्यक्त केले.