एकूण चार प्रकरणी गुन्हे; संजय खोलापूरकरही आरोपी

गोसीखुर्द प्रकल्पांच्या विविध कामांच्या कंत्राट प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने)  एकूण चार प्रकरणात गुन्हे दाखल केले. यात  भाजपचे विद्यमान आमदार मितेश भांगडिया, भाजप मित्रपक्ष तेलगू देसम पार्टीचे आमदार रामाराव रेड्डी यांच्या कंपन्यांसह चार कंपन्यांचा समावेश आहे.

मोखाबर्डी उपसासिंचन योजनेतील नवतळा, मेटेपार, चिखलापार, शाखा कालव्याचे मातीकाम, बांधकाम आणि  अस्तरीकरणाच्या कामाकरिता निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर निविदेचे मूल्य वाढवण्यात आले, परंतु जुन्या निविदेनुसारच व त्याच अर्हतेनुसार अपात्र ठरणाऱ्या मेसर्स एम.जी. भांगडिया या कंपनीला कंत्राट देण्यात आले. यावरून अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमत करून कंत्राट मिळवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सदर पोलीस ठाण्यात तत्कालीन कार्यकारी अभियंता उमाशंकर पर्वते, विभागीय लेखाधिकारी सी.टी. जिभकाटे, अधीक्षक अभियंता डी.डी. पोहेकर, मुख्य अभियंता सो.रा. सूर्यवंशी, कार्यकारी संचालक दे.पा. शिर्के व मेसर्स एम.जी. भांगडिया कंपनीचे फिरदोस खान पठाण यांच्याविरुद्ध फसवणूक व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

गोसीखुर्द डावा कालवा मातीकाम व बांधकामाच्या निविदेचेही मूल्य वाढवण्याच्या प्रकरणात तत्कालीन कार्यकारी अभियंता दशरथ बोरीकर, कार्यकारी अभियंता वसंत गोन्नाडे, विभागीय लेखाधिकारी धनराज नंदागवळी, अधीक्षक अभियंता पोहेकर, सो.रा. सूर्यवंशी, कार्यकारी संचालक रो.मा. लांडगे, मेसर्स श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन कंपनी आणि आर. बलरामी रेड्डी, आमदार रामाराव रेड्डी, श्रीनिवासुला रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिसरा गुन्हा मोखाबर्डी उपसासिंचन योजनेच्या वडाला शाखा कालव्याचे मातीकाम, बांधकाम आणि अस्तरीकरणातील गैरव्यवहारासंदर्भात आहे.  त्यातही पर्वते, जिभकाटे आणि रामरावसह त्यांच्या कंपनीला आरोपी करण्यात आले आहे.

गोसीखुर्द उजव्या कालव्याच्या घोडाझरी शाखा कालवा व उपशाखा कालव्याच्या अस्तरीकरण कामाच्या निविदेत बेकायदेशीर मूल्य वाढवण्याच्या प्रकरणात चौथा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात तत्कालीन कार्यकारी अभियंता ललित इंगळे, विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, सूर्यवंशी, शिर्के यांना आरोपी करण्यात आले आहे. सिंचन घोटाळा प्रकरणानंतर खोलापूरकर यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली व काही काळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले, परंतु सिंचन घोटाळ्यात यापूर्वी त्यांना आरोपी करण्यात आले व गडकरींवर आरोप होऊ लागल्यानंतर त्यांनी तेही काम सोडले.

आमदार भांगडियांच्या पाठीशी कोण?

चार गुन्ह्य़ांपैकी दोन गुन्ह्य़ात भाजपच्या मित्र पक्षाचे आमदार रामाराव रेड्डी यांच्या कंपनीसह त्यांना आरोपी करण्यात आले आहे. करारावर रामाराव यांची स्वाक्षरी आहे, परंतु करारावेळी कंपनीचे संचालक असलेले विद्यमान आमदार मितेश भांगडिया यांना आरोपी करण्यात आले नाही. करारावर फिरदोस पठाण यांची स्वाक्षरी असून आमदार भांगडिया यांनी त्याच्या नावाने आममुखत्यारपत्र करून दिले होते, असे एसीबीकडून सांगण्यात येते, परंतु तत्कालीन कामासाठी कंपनी आरोपी होत असेल तर संचालक का नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

एक आरोपपत्र दाखल, सात प्रकरणी तपास

सिंचन घोटाळ्यात एसीबीच्या नागपूर कार्यालयातर्फे ४० प्रकरणांची चौकशी करण्यात येत आहे. त्यापैकी आठ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून एका प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले. उर्वरित सात प्रकरणांचा तपास सुरू आहे. लवकरच त्या प्रकरणांमध्येही आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे एसीबीकडून सांगण्यात येते.