शाळेचे शुल्क न भरल्याने कारवाई; ‘स्वामीनारायण’वर पालकांची धडक

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : शाळेचे शुल्क न भरल्याचा ठपका ठेवत वर्धमाननगर येथील ‘द स्वामीनारायण’ शाळेने जवळपास पाचशे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग ग्रुपमधून काढल्याने पालकांनी शाळेसमोर आंदोलन केले. करोनासारखे महामारीचे संकट असतानाही शाळा शुल्कासाठी छळ करीत असल्याचा आरोप करीत शुल्कातून ५० टक्के सूट द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ऑनलाईन वर्गामधून विद्यार्थ्यांना हेतुपुरस्सर वगळल्याचा आरोप करीत अनेक पालक बुधवारी सकाळी ‘द स्वामीनारायण शाळा’ येथे धडकले. शाळेचे शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना या वर्गामधून वगळण्यात आल्याची टीका पालकांनी केली. पालकांना शुल्क न भरल्याबाबत शाळेकडून फोन करण्यात आला. शुल्क न भरल्याने बुधवारपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गाना बसू दिले जाणार नाही असे सांगण्यात आले. यामुळे संतप्त पालकांनी बुधवारी सकाळी वर्धमाननगर येथील शाळेच्या परिसरात धडक दिली. यावेळी पालकांच्या प्रतिनिधींनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोठारी यांनी पालकांशी संवाद साधला. शुल्काच्या कारणामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांला वर्गापासून तसेच परीक्षेपासून वंचित ठेवणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. पालकांनी शुल्क भरले नसल्याने शाळेलाही आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. शिक्षकांचे वेतन देण्यात शाळेला अडचणी येत आहेत, असे कोठारी यांनी यावेळी पालकांशी बोलताना सांगितले. कोठारी यांच्या आश्वासनानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले.

५० टक्के शुल्कमाफीची मागणी

करोनाकाळात पालक आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे शाळेचे पूर्ण शुल्क भरणे कठीण असल्याने शाळा शुल्कातून ५० टक्क्यांनी सूट द्यावी, अशी मागणी पालकांनी केली होती. या संदर्भात स्वामीनारायण संस्थेच्या मध्यवर्ती समितीबरोबर चर्चा करण्यात येईल. या संदर्भातील निर्णय आठ दिवसांत कळवण्यात येईल, असेही संस्थेच्या वतीने पालकांना कळवण्यात आले.

उपमहापौरांच्या मुलीलाही फटका

द स्वामीनारायण शाळेने शुल्क न भरल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून बाहेर काढले त्यामध्ये उपमहापौर मनीषा धावडे यांची मुलगीही आहे. यावर मनीषा धावडे यांनी काही कामात व्यस्त असल्याने एका सत्राचे शुल्क बाकी असल्याने शाळेने हा गंभीर प्रकार के ल्याचा आरोप केला.