करोनाकाळात शहरातील मृत्यूची संख्या दुपटीने वाढली आहे. शहरात दररोज सुमारे ६० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते आणि आता ही संख्या सुमारे १२५ वर पोहोचली आहे. यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचे प्रणेते विजय लिमये यांनी अंत्यसंस्कारासाठी घडी घालता येणारे पिंजरे तयार केले आहेत.  हे पिंजरे एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवता येत असल्याने करोना संकटात ते प्रभावी ठरणार आहेत. क्षमतेपेक्षा जास्त शव अंत्यसंस्कारासाठी आल्यास स्मशानभूमीत कमी पडणाऱ्या कठडय़ांवर उपाय म्हणून हे पिंजरे उपयोगी ठरणार आहेत. पिंजऱ्यातून राख सांडत नसल्याने ते पर्यावरणपुरकही आहेत.

शहर एकीकडे स्मार्ट होत असताना आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सोयीसुविधा अपुऱ्या पडत आहेत. काही स्मशानभूमीवर काही वर्षांपूर्वी महिन्याला दहा ते बारा अंत्यसंस्कार होत होते, आता ती संख्या ८०पर्यंत पोहोचली आहे. अंबाझरी स्मशानभूमीवरील भार कमी व्हावा म्हणून फ्रेंड्स कॉलनी येथे स्मशानभूमी तयार करण्यात आली, पण येथेही ओटय़ांची संख्या दोनच आहे.  हीच अवस्था उर्वरित इतर स्मशानभूमीची आहे. करोनामुळे महापालिके च्या स्मशानभूमीबाबत असलेल्या त्रुटी समोर आल्या आहेत. सध्या अंत्यसंस्काराची संख्या दुप्पट झाल्यामुळे एका ओटय़ावर दोन तर काही ठिकाणी जमिनीवरच लाकडे रचून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ओळखले जाणारे विजय लिमये यांनी यावर तोडगा काढला आहे. पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करता यावे म्हणून दोन भागात विभागले जाणारे पिंजरे त्यांनी तयार केले आहेत. वजनाने हलके  असणारे हे पिंजरे जमिनीवर कु ठेही मांडता येतात. त्याठिकाणी पर्यावरणपूरक मोक्षकाष्ठ रचून अंत्यसंस्कार करता येतात. अंबाझरी स्मशानभूमीवर हा पिंजरा लावण्यात आला असून पाच पिंजरे तयार झाले आहेत. तीन पिंजरे मानेवाडा स्मशानभूमीवर लावण्यात येणार आहेत. पिंजऱ्याचे दोन भाग होतात. भविष्यात त्याला चाके लावण्यात येणार असल्याने वाहतुकीसाठीही सोपे होणार आहे.

फोल्डेबल शवपेटीचा प्रयोग

शवपेटीसाठीही विजय लिमये यांनी अशीच संकल्पना आणली होती. सात फु टांची शवपेटी बहुमजली इमारतीत नेणे अशक्य होते. उद्वाहनातून(लिफ्ट) देखील ती नेणे शक्य होत नव्हते. त्यामुळे तीन भागात विभागली जाणारी साडेतीन फु टाची शवपेटी तयार केली. हे तीन भाग कितीही मजली इमारत असली तरी तेथे नेऊन सहज जोडता येतात. अशा तीन शवपेटय़ा त्यांनी रायपूर येथे पाठवल्या असून शहरातील मैत्री परिवाराने अशा दोन शवपेटय़ांची मागणी त्यांच्याकडे केली आहे.

ओटय़ांची संख्या मर्यादित

शहरात एकू ण १४ स्मशानभूमी असून गंगाबाई, मोक्षधाम, मानेवाडा आणि त्यानंतर अंबाझरी या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कारासाठी असणाऱ्या ओटय़ांची व्यवस्था दहाच्या वर आहे, तर उर्वरित घाटांवर ओटय़ांची संख्या दहा आणि पाचच्या आतच आहे. गंगाबाई घाटावर २२, मोक्षधाम येथे १८, मानेवाडय़ात १६ तर अंबाझरी स्मशानभूमीवर दहा ओटे आहेत.