देशभरात टाळेबंदी असताना सरकारी कार्यालयातही पाच टक्क्यांपेक्षा अधिकची उपस्थिती असू नये, असा आदेश सरकारने काढला. मात्र, त्याला हरताळ फासत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांसह बैठकीच्या नावावर सुमारे ४० जणांची पार्टी रंगल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या क्षेत्राच्या आमदारांनीच जिल्ह्य़ाच्या पालकमंत्र्यांकडे याची तक्रोर केली आणि अवघ्या काही तासातच तक्रोर मागे घेण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

चिखलदरा तालुक्यातील रायपूर, सेमाडोह मार्गावर रायपूरपासून सात ते दहा किलोमीटर अंतरावर वनखात्याची कारागोलाई व्याघ्र संरक्षण कुटी आहे. एक मे रोजी महाराष्ट्रदिनी सकाळी दहा वाजताच्या सुमारास सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. एस. शिवबाला यांच्यासह इतर विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी पार्टी करत असल्याची तक्रोर मेळघाटचे आमदार राजकु मार पटेल यांनी अमरावती जिल्ह्य़ाच्या पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्याकडे एका पत्रान्वये केली. यात एक अधिकारी प्रतिनियुक्तीवर इतर विभागात जात असल्याने ही पार्टी केल्याचा आरोपही केला.

या पत्राला काही तास होत नाही तोच त्यांनी पत्र मागे घेतले. माझी दिशाभूल करण्यात आली. काही राजकीय विरोधकांकडून ही खोटी माहिती पुरवून माझ्यात व वनाधिकाऱ्यात वैमनस्य निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, या आशयाचे पुन्हा एक पत्र त्यांनी पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांना लिहिले. तर दुसरीकडे सिपना वन्यजीव विभागानेही झालेल्या प्रकाराचे खंडन केले. अशी कुठलीच पार्टी आम्ही केली नाही. तर वणव्याचा ऋतू असल्याने सेमाडोह ते रायपूर वनक्षेत्रात सामूहिक पायदळ गस्त करण्यात आली. दरम्यान, दुपारच्यावेळी मध्यंतरात सर्वानी जेवण केले, असा खुलासा त्यांनी केला. हा खुलासा ग्राह्य़ धरला तरी वन्यजीव विभागाच्या गस्तीत प्रादेशिक विभागाच्या उपवनसंरक्षक कसे उपस्थित होते, हा प्रश्न कायम आहे.

देशात टाळेबंदी असताना सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. अशावेळी दोन वनखाते मिळून २५-३० जण गस्तीसाठी कसे एकत्र येऊ शकतात, हाही प्रश्न आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आमदार राजकुमार पटेल यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका होत आहे.

आमदारांनी केलेले आरोप चुकीचे होते आणि त्यांनी स्वत: दिलगिरी व्यक्त केली आहे. गस्तीदरम्यानचे जेवणाला पार्टी कसे म्हणता येईल. हा आरोप गैरसमजुतीतून झाला होता. वणव्यामुळे आम्ही सामूहीक गस्तीवर होतो, असे सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक श्री. शिवबाला यांनी सांगितले.