वनाधिकाऱ्यांच्या विधानातील विसंगती भोवली
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या वाघांच्या शिकारीतील एका प्रकरणात केवळ भ्रमणध्वनीच्या सीडीआरवरून शिकाऱ्यांना सात वषार्ंची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अवघ्या काही दिवसांनी दुसऱ्या एका प्रकरणात वनखात्याला त्याची बाजूच ठामपणे मांडता न आल्याने शिकाऱ्यांची डोळ्यादेखत सुटका पाहण्यापासून वनखात्यापुढे पर्याय उरला नाही. ‘हार्डकोअर’ शिकारी या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडल्याने पुन्हा तो वाघांच्या शिकारीसाठी सज्ज होण्याची भीती आता वर्तवली जात आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ढाकणा वाघ शिकार प्रकरणातील आरोपींना केवळ भ्रमणध्वनीच्या सीडीआरवरून आणि त्याच्या बयाणाच्या ध्वनीचित्रफितीवरून अमरावती न्यायालयाने तब्बल ७ वष्रे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सर्वाधिक शिक्षा झालेले भारतातील हे पहिलेच प्रकरण होते. मात्र, घटांगच्या वाघ शिकार प्रकरणातील त्रुटी वनखात्याला भोवल्या आणि एक चांगली संधी वनखात्याने गमावली. पूर्व मेळघाटमधील घटांगमध्ये १ अस्वल, २ बिबटे आणि डीएनए अहवालानुसार ५ वाघ मारले गेले. २०१३ मध्ये पुण्यात १४ शिकाऱ्यांना वनखात्याने अटक केली होती आणि अरकाश, बंदरिया आणि कुंतर हे तीन आरोपी या प्रकरणात दोषी आढळले होते. यातील अरकाश हा ‘हार्डकोअर’ शिकारी म्हणून कुख्यात आहे. वाघासाठी त्यांनी सापळा रचला होता आणि त्यात अस्वल अडकले. या अस्वलाच्या शिकारीची चौकशी करत असताना याच ठिकाणी २ बिबटे आणि ५ वाघ मारल्याचेही समोर आले. त्यामुळे वेगवेगळी प्रकरणे यात दाखल करण्यात आली. मुळातच या प्रकरणात आता अधिकाऱ्यांमधील अहंभाव आड आल्याचे बोलले जात आहे.
कायद्यानुसार अशा गंभीर प्रकरणांची चौकशी सहाय्यक वनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असणे गरजेचे आहे. या प्रकरणात सुरुवातीला सहाय्यक वनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडेच हे प्रकरण गेले होते. नंतर अधिकाऱ्यांचे ‘अह्म’ आड आले आणि चौकशीची सुत्रे वनपरिक्षेत्र दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आली. एक, दोन नव्हे, तर लागोपाठ चार वनपरिक्षेत्र दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या हातात चौकशीची सुत्रे आली. त्यामुळे अधिकारी बदलले तशी चौकशीची दिशाही बदली. अधिकाऱ्यांच्या विधानात विसंगती दिसून आल्यामुळे न्यायालयाने त्यांचे म्हणणे उडवून लावले. परिणामी, कोणताही सबळ पुरावा वनखात्याला न्यायालयासमोर सादर करता आला नाही. शिकाऱ्यांनी शिकार केली, हे जगजाहीर असतानाही केवळ पुराव्याअभावी शिकारी मोकळ सुटले.
ढाकणापेक्षाही घटांगचे वाघ शिकार प्रकरण अधिक गंभीर असतानासुद्धा चौकशीतील चुका वनखात्याला भोवल्या. या शिकाऱ्यांचा स्थानिक शिकाऱ्यांशी संबंध असल्यामुळे भ्रमणध्वनीवरील त्यांच्या संवादाचा सीडीआर वनखात्याने काढला का, तो काढला असल्यास न्यायालयात तो सादर केला का, वनखाते उच्च न्यायालयात धाव घेणार का, हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत.