आई, पत्नी, मुलगा व नोकरालाही संक्रमण; शहरातील एकूण रुग्णसंख्या नऊवर

नागपूर :  दोन आठवडय़ांपासून करानोचा नवीन रुग्ण न आढळल्याने समाधान व्यक्त करणाऱ्या नागपूरकरांना शुक्रवारी जोरदार हादरा बसला. गुरुवारी आढळलेल्या करोनाग्रस्ताची आई, पत्नी, मुलगा व नोकरालाही या आजाराचे संक्रमण झाल्याने प्रशासनासमोरही नवीन आव्हान उभे ठाकले आहे.

गुरुवारी आढळलेला करोनाग्रस्त १६ मार्चला  व्यवसायासंबंधी कामासाठी  नागपूरहून दिल्लीला रेल्वेने गेला होता. तेथून तो १८ मार्चला नागपुरात परतला. तीन दिवसांनी त्याला सर्दी, खोकला व तापाची लक्षणे दिसून आले. औषध घेतल्यावरही त्याला आराम पडला नाही. त्यामुळे २५ मार्चला मेयोत उपचारासाठी पोहचला. दिल्ली प्रवासाचा इतिहास बघता त्याच्या घशातील द्रव्याचे नमुने मेयोतील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील केंद्रात तपासले असता त्याला करोना असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या घरात आई, पत्नी व  मुलासह नोकरलाही ताप, सर्दी, खोकला असल्याने त्यांनाही गुरुवारी रुग्णालयात दाखल केले. त्यांचेही नमुने घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल शुक्रवारी सकारात्मक येताच आरोग्य विभाग हादरून गेला. नागपुरात आता करोनाग्रस्तांची संख्या नऊवर गेली आहे. याशिवाय रुग्णाच्या सपंर्कातील ३३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हे ३३ जण आणखी कोणाच्या संपर्कात आले होते त्यांना शोधण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. काल रात्रीपासून मेयोत १७ नुमने  पाठवण्यात आले होते. त्या सर्वाचा अहवाल आज शुक्रवारी नकारात्मक आला आहे. काही नवीन नमुन्यांची तपासणी सुरू असून त्यांच्या अहवाल बातमी लिहिपर्यंत आला नव्हता. मेडिकलमध्ये शुक्रवारी १६ संशयित रुग्णांना दाखल केले असून त्यामध्ये १३ पुरुष व ३ महिला आहेत.

गडकरींनी महापौर, शहर अध्यक्षांकडून आढावा घेतला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज शुक्रवारी  महापालिका व शहर भाजपकडून व्यवस्थेचा आढावा घेतला. शहरात संचारबंदी असताना विविध भागात महापालिकेच्यावतीने स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. केंद्र सरकारने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे गडकरींनी शुक्रवारी सकाळी महापौर संदीप जोशी, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके आणि खासदार विकास महात्मे यांच्यासोबत बैठक पक्षाकडून आणि महापालिकेच्याकडून करण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली.

मुलीचा अहवाल नकारात्मक

गुरुवारी करोनाची लागण झालेल्याच्या रुग्णाच्या घरात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असे  सदस्य एकत्र राहतात. त्यापैकी मुलीला करोनाची लागण झालेली नाही. तिला ताप असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे तिचेही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र शुक्रवारी तिचा अहवाल नकारात्मक आला.

डॉक्टरही संशयित

मेडिकलमधील द्वितीय वर्षांचा स्त्रीरोग व प्रसूती विभागाचा निवासी डॉक्टर आणि एका सहायकामध्येही करोनाचे लक्षण दिसून आले आहेत. दोघांनाही मेयोत दाखल केले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.