विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर कोटय़वधींची उलाढाल  

साडेतीन मुहूर्तापकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा या सणाला सोने-चांदी खरेदीसाठी नागपूरकरांची सराफा बाजारात एकच गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे, सोन्याचे दर ४० हजारांच्या जवळपास पोहचले असतानाही ग्राहकांची संख्या कमी झालेली नाही. भविष्यात सोन्याचे दर कमी होण्याचे चिन्हे नसल्याने गुंतवणूक म्हणून या मुहूर्तावर नागपूरकरांची जोरात खरेदी सुरू आहे.

देशात आíथक क्षेत्राला मंदीने ग्रासलेले असतानाच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याचे दर ३८ हजार ८३० प्रति दहा ग्रॅम तर चांदी ४५ हजार ५०० प्रति किलो एवढे होते. सोन्याचा बार, नाणी किंवा गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा दागिने घेण्यात नागपूरकरांना असलेली रुची आजही तुलनेत अधिक आहे.  दरवर्षी सराफा बाजारात कोटय़वधींची उलाढाल होते. मात्र यंदा दर वाढले तरी त्याचा कोणताच परिणाम व्यवसायावर झालेला नसल्याचे व्यापारी सांगतात. अनेक महिलांनी सोन्याची आपटय़ाची पानेही खरेदी केली. याशिवाय पारंपरिक मंगळसूत्रे, अंगठय़ा, नेकलेस, बांगडय़ा, कानातले, सोन्याचे नाणे, गोफ याचीही खरेदी जोरात होती. जुल महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्क सरकार कमी करेल आणि त्यामुळे सोन्याचे दर आटोक्यात येतील, अशी आशा ग्राहकांना होती. मात्र नेमके याचे उल्ट झाले. सोन्यावरील सीमा शुल्क २.५ टक्क्यांनी वाढवण्यात आले. पूर्वी दहा टक्के असलेले हे शुल्क आता १२.५ टक्क्यांवर पोहचले आहे. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरवाढीवर झाला आहे. त्याशिवाय सोन्याच्या खाणीतून सोने काढण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील दरवाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसल्यानेही सोन्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. तरीही सोन्याची झळाळी मात्र कायम आहे.

सोन्याचा भाव कमी होण्याचे चिन्हे नाहीत. भाव जास्त असल तरी बाजारात तेजी आहे. भविष्यात सोने गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे ग्राहक  सोने खरेदी करताहेत. आमच्या दालनात अनेक सवलती देण्यात आल्या आहेत.- राजेश रोकडे, संचालक, रोकडे ज्वेलर्स.

पारंपरिक दागिना हा नागपूरकरांची पहिली पसंती आहे. आमच्या दालनात महाराष्ट्रीयन दागिन्यांची मागणी जास्त आहे. विजयादशमीसाठी अनेकांनी पूर्व नोंदणी केली आहे. आम्ही मेकिंग चार्जेसवर २० टक्के सूट ठेवल्यानेही ग्राहक त्याचा फायदा घेत आहेत. – राजेश लोंदे, संचालक, लोंदे ज्वेलर्स.