23 October 2019

News Flash

सणासुदीच्या तोंडावर  सोन्याच्या भावात घसरण

डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका शुक्रवारी सोने आणि चांदीला बसला.

गेल्या चार दिवसांत तीन हजारांनी दर कमी; ग्राहकांचा मात्र थंड प्रतिसाद

सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत उच्चांक गाठत सोने तोळ्यामागे जवळपास ४० हजार रुपयांपर्यंत पोहचले होते. त्यात आताघसरण होऊ लागली आहे. गेल्या तीन-चार दिवसांत सोन्याचा दर तब्बल तीन हजार रुपयांनीपडला आहे. तरी मात्र सराफा बाजारात ग्राहकांचा थंड  प्रतिसाद आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका शुक्रवारी सोने आणि चांदीला बसला. नागपुरात सोन्याच्या भावात २७० रुपयांनी तर चांदीच्या भावात ७०० रुपयांनी घसरण झाली. सलग तीन दिवसांपासून ही घसरण सुरू असून आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळ्याला ३७ हजार पाचशे रुपयांवर आला. जो गेल्या काही दिवसांपूर्वी ३९ हजार ७०० रुपयांपर्यंत गेला होता. सोन्याबरोबर चांदीच्या भावानेही गेल्या महिन्यात उच्चांक गाठला होता. चांदी किलोमागे ५१ हजार ४८९ रुपयांवर गेली होती. मात्र आता चांदीची चकाकी मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. चांदी पाच हजार रुपयांनी कमी होऊन ४६ हजार ५०० रुपयांवर स्थिरावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्याचे भाव जवळपास ३ हजारांनी कमी झाले असले तरी ग्राहकांनी मात्र सराफा भाजाराकडे पाठ फिरवली आहे. सणासुदीत ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या सराफा बाजारात सोन्याचे दर कमी होऊनही कमालीची शांतता आहे. वास्तविक सोन्याचे भाव उतरल्यावर ग्राहकांकडून मोठी गुंतवणुकीची आशा असते. मात्र पुढे अजून भाव कमी होतील या अपेक्षेमुळे ग्राहक खरेदीसाठी थांबलेले आहेत. नागपूरच्या बाजारपेठेत २४ कॅरेट सोन्याची मागणी जास्त असून स्थानिक ग्राहकांच्या व्यतिरिक्त मध्यप्रदेश, छत्तीसगढ येथील ग्राहकही मोठय़ा प्रमाणात नागपुरातून सोने खरेदी करतात. गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक कमी करण्यास प्राधान्य देऊन शेअर बाजाराकडे मोर्चा वळवला आहे. यामुळे सोन्याच्या भावात घसरण झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पुढील महिन्यात नवरात्र, दसरा आणि दिवाळी आहे. त्यामुळे भाव वाढणे अटळ आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून सोन्याचे भाव कमी झाले आहे. ग्राहक अजून भाव कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र दसरा-दिवाळीत भाव नक्कीच वाढतील. सोन्याचे भाव जेव्हा वाढत असतात तेव्हाच ग्राहक सोने खरेदी करतात ही नागपूरची परंपरा राहिली आहे. लोकांनी भरपूर सोनं खरेदी केलं आहे. त्यामुळे नवरात्रापासून बाजारात तेजी अपेक्षित आहे. – पुरुषोत्तम कावळे,  अध्यक्ष महाराष्ट्र सुवर्णकार समाज

First Published on September 21, 2019 1:27 am

Web Title: gold prices dropped akp 94