डिसेंबरअखेर सफारी सुरू होण्याची शक्यता

नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील भारतीय सफारी सुरू करण्याच्या दिशेने वन्यप्राणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या परवानगीनुसार गोरेवाडा बचाव केंद्रातील दोन वाघ, सात बिबट आणि सहा अस्वल प्राणिसंग्रहालयात स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे डिसेंबरअखेर ही सफारी सुरू होण्याची शक्यता बळावली आहे.

बचाव केंद्रातील राजकुमार नामक वाघाला २० नोव्हेंबरला स्थलांतरित करण्यात आले होते. त्यानंतर  इतरही प्राणी स्थलांतरित करण्याची प्रक्रि या सुरू होती. यात सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या चमूने महत्त्वाची कामगिरी बजावली. गोरेवाडा प्रशासन आणि प्रादेशिक विभागात रितसर पत्रव्यवहार झाल्यानंतर ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राचे पिंजरे, वाहन तसेच पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी गोरेवाडा प्रशासनाच्या सहकार्यासाठी गेला. प्राणी पकडणे तसेच त्यांना पिंजऱ्यात टाकणे याचा दीर्घ अनुभव केंद्राच्या चमूला असल्याने त्याचा फायदा गोरेवाडा प्रशासनाला झाला. एकाही वन्यप्राण्याला बेशुद्ध न करता ही स्थलांतरण प्रक्रि या यशस्वी झाली. त्यासाठी गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक प्रमोद पंचभाई तसेच गोरेवाड्यातील वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शिरीष उपाध्ये, उपसंचालक डॉ. विनोद धूत, प्रादेशिक उपवनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्ल, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण चमूने कार्य के ले. वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शालिनी ए.एस., डॉ. मयूर पावशे, डॉ. सुजित कोलंगथ, डॉ. तिस्ता जोसेफ तसेच ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राचे डॉ. सय्यद बिलाल अली, डॉ. मयूर काटे यांनी स्थलांतरित करण्यात येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेतली.