गर्दी जमविण्यासाठी हजार बसगाडय़ांचे नियोजन

स्वंयघोषित योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समूहाक डून नागपुरात सुरू करण्यात येणाऱ्या फळ प्रक्रिया केंद्रासाठी (फूड पार्क) केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या ‘रेड कार्पेट’ वागणुकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरूअसतानाच आता या केंद्राच्या भूमिपूजनाला लाखोंची गर्दी व्हावी म्हणून सरकारी यंत्रणेचीही अप्रत्यक्षरीत्या मदत घेतली जात आहे.

पूर्व विदर्भात आढळणाऱ्या दुर्मीळ वन औषधींवर प्रक्रिया करणारा मोठा प्रकल्प नागपुरातील मिहान प्रकल्पात सुरू होत आहे. यासाठी पतंजली उद्योग समूहाला सवलतीच्या दरात २३० एकर जागा देण्यात आली आहे. १० तारखेला या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असून त्यासाठी खुद्द रामदेवबाबा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हा प्रकल्प नागपुरात सुरू व्हावा म्हणून बाबांचे मन वळविणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांचे हित साधणारा हा प्रकल्प असून यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील, असा दावा गडकरी यांनी अलीकडेच नागपुरात केला आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा रामदेवभाबा भक्तांचा प्रयत्न आहे. विदर्भातून एक लाख शेतकऱ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्याचे आयोजकांचे नियोजन आहे. यासाठी एक हजार बसेसची गरज भासणार आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात बसेसची जुळवाजुळव करण्याचे मोठे आव्हान आयोजकांपुढे आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून मदत मागण्यात आली आहे. फूड पार्कच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपूर्णपणे खासगी आहे. एरवी अशा प्रकारचा कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे आयोजकांचीच असते. मात्र, रामदेवबाबांची कंपनी त्याला अपवाद ठरली आहे.

प्रत्येक उद्यानातून बसेस सुविधा

फूडपार्क भूमिपूजनाला अपेक्षित गर्दी व्हावी म्हणून जोरदार तयारी आयोजकांकडून सुरू आहे. शहरातील विविध उद्यानात पतंजलीसह  योग साधना करणारी इतरही मंडळे आहेत. त्यांना या कार्यक्रमासाठी नेण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी प्रत्येक उद्यानातून बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. कार्यक्रमाला येणाऱ्यांची जेवणाचीही व्यवस्था आहे.  किती लोक येणार यानुसार बसेसची संख्या निश्चित केली जाईल,  असे समितीचे प्रसिद्धी प्रमुख मनोज खंडाळ यांनी सांगितले.

साधकांसाठी ड्रेसकोड

कार्यक्रमाला जाणाऱ्या पतंजलीच्या योग साधकासाठी ड्रेसकोड निश्चित करण्यात आला आहे. पुरुषांसाठी पांढऱ्या रंगाचा बंगाली पायजामा तर महिलांनी पांढरी साडी किंवा याच रंगाचा सलवार कमीज परिधान करायचा आहे, तशा सूचना सर्वाना देण्यात आल्या आहेत, असे मनोज खंडाळ म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना तोडी सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही फक्त या बसेस उपलब्ध होऊ शकतील अशा खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांची नावे त्यांना सांगितली आहेत. त्यावरील खर्च आयोजकांनाच करायचा आहे, याचा जिल्हा प्रशासनाशी कोणताही संबंध नाही.