नागपूर :  आपल्या कामाच्या पद्धतीमुळे कायम चर्चेत असणारे तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत सत्ता पक्ष असलेल्या भाजपच्या ज्येष्ठ सदस्यांसह विविध पक्षांच्या गटनेत्यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.

माजी महापौर प्रवीण दटके म्हणाले, नागपूर महापालिका नियमात राहून काम करते. कडक आणि शिस्तप्रिय अशी त्यांची ख्याती असली तरी शहरातील विकास कामांसोबत जनतेची कामे होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही मुंढे यांना सहकार्य करू. शहरातील विविध विकास प्रकल्प थांबावे किंवा त्यावर परिणाम व्हावा, यासाठी महाविकास आघाडीने मुंढे यांची नियुक्ती केली असेल तर ते दुर्दैवी आहे. मात्र मुंढे यांचे आम्ही स्वागत करतो.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे म्हणाले, आयुक्त अभिजित बांगर यांनी शहराच्या विकासासाठी चांगले काम केले. आता तुकाराम मुंढे यांचे स्वागत करतो. नागपुरात त्यांनी पदभार सांभाळल्यानंतर त्यांच्या कामाबाबत बोलता येईल. आता  ‘तुका म्हणे उगे रहा आणि जे जे होते ते ते पहा’ या ओळीप्रमाणे महापालिकेत काम करावे लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे म्हणाले, मुंढे यांच्या नियुक्तीमुळे आता खऱ्या अर्थाने महापालिकेचा कारभार शिस्तीने चालणार आहे. त्यांनी आजपर्यंत जसे काम केले त्याचप्रमाणे नागपूर महापालिकेत काम करावे.

अपक्ष उमेदवार आभा पांडे म्हणाल्या, तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीचे स्वागत करते. त्यांच्या नियुक्तीमुळे आता पदाधिकारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांवर  खऱ्या अर्थाने वचक राहील आणि जनतेची कामे होतील. दोन वर्षांनी निवडणुका असल्यामुळे मुंढे यांची नियुक्ती केली गेल्याचे पांडे म्हणाले.

काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य प्रफुल गुडधे म्हणाले, तुकाराम मुंढे यांची बदली ही प्रशासकीय आहे. त्यांचे स्वागत करतो. त्यांना आम्ही सहकार्य करू.

भाजपचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी म्हणाले, तुकाराम मुंढे यांची ख्याती ही वादग्रस्त असली तरी नागपूर महापालिकेत काम करताना त्यांना सहकार्य करू. त्यांच्या नियुक्तीचे आम्ही स्वागत करू आणि त्यांना सहकार्य करू मात्र शहराच्या विकास कामात जर सरकारने आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर विरोध केला जाईल.