रेल्वे अपघातात एक पाय गमावल्यावर आलेल्या अपंगत्वाला कुरवाळत न बसता तेच बलस्थान करून ‘मीरा पिक’ शिखर गाठणारा अशोक मुन्न्ो हा युवक माऊन्ट एव्हरेस्ट मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. काटोल तालुक्यातील मूर्ती या छोटय़ाशा खेडय़ातील अशोकला मात्र, या मोहिमेसाठी समोर असलेल्या आर्थिक अडचणींचा डोंगर पार करताना मोठी ओढाताण करावी लागत आहे.

अशोक मुन्न्ो याने लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्याने त्याचा आजवरचा प्रवास आणि आगामी मोहिमेबद्दल गप्पा मारल्या. २००८ ला एका दिवशी जी.टी. एक्सप्रेसने इटारसीहून नागपूरला येताना रेल्वेगाडीतून पडल्याने त्याचा उजवा पाय कापला गेला. त्याच गाडीतून त्याला पुढे नागपुरातील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. पायावर दोन शस्त्रक्रिया झाल्या परंतु चालता येईना. कुबडय़ाशिवाय उभे राहणेही शक्य होत नव्हते. कशीबशी कुबडय़ांच्या आधारावर दोन वर्षे काढली. नागपुरात भाडय़ाने खोली घेऊन राहत असताना एक दिवस एनआयटी उद्यानात तो गेला आणि त्याच्या जीवनाला कलाटली मिळाली.

कुबडय़ांच्या आधारे फिरत असल्याचे बघून इंद्रधनू अपंग उत्थान संस्थेच्या उपाध्यक्ष मालती शास्त्री यांनी त्याची आस्थेने चौकशी केली. अशोकच्या पायावर तिसरी आणि अखेरची शस्त्रक्रिया व्हायची होती तेव्हा त्यांच्याच संस्थेने मदतीचा हात दिला. त्या शस्त्रक्रियेनंतर अशोक कुबडय़ांच्या आधाराशिवाय चालू लागला. तो क्षण त्याच्या जीवनातील सर्वात आनंदाच होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून दीडशे रुपयांचा कृत्रिम पाय मिळवला. त्यानंतर तर काय अशोक चारचाकी चालवून आपला उदरनिर्वाह करू लागलो. दुचाकी चालवणे, धावणे, पोहणे, झाडावर, गावाकडील आनंद टेकडीवर चढू लागला. कुणाच्याही मदतीशिवाय सामान्यांनाप्रमाणे दैनंदिन कामे करू लागला. परंतु कुबडय़ा घेऊन कित्येक तास बेडवर पडून राहायचा त्या काळात त्याने टीव्हीवर बघितलेली कृष्णा पाटील यांची मुलाखत विस्मरणात गेलेली नव्हती. कृष्णा पाटील नुकतीच (२००९) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून परतली होती. तिच्याप्रमाणे आपणही माऊंट एव्हरेस्ट गाठण्याची खूणगाठ अशोकने बांधली होती. अपघातात पाय गमावल्याने आता आयुष्यवर कुबडय़ांशिवाय जगात येणार नाही, असे सांगून समाजाने हिणवले. परंतु त्याचवेळी या समाजाचा भाग असलेल्या काही व्यक्तींनी मदतीचा हात देऊन फार मोठा आधारही दिला. सुर्वेनगर मैदानावरील झाडांवर पायाची मदत न घेता हाताने चढायचा सराव केला. त्याच्या या विविध धाडसांची माहिती ‘आऊटवर्ड बाऊंड’ संस्था संचालक सुधीर मोहरीर यांनी वाचली होती. त्यांनी मदत केली. यानंतर पी.ओ. इंटरनॅशनल या कंपनीने ‘सदिच्छा दूत’ बनवले आणि साडेपाच लाख रुपयांचा बूट दिला. यामुळेच अशोकने लेह-लड्डाखमध्ये ३ हजार किमी बाईक राईडमध्ये ५५० सीसी ची बुलेट चालवली. सातारा हिल हाफ मॅराथॉन २२ किमी, विदर्भ बाईक राईड १५०० किमी, हिमालय कुगती-पास १६,७०० फूट आदी स्पर्धामध्ये यशस्वीपणे सहभाग नोंदवला. २१ हजार २४७ फूट उंचीचे मीरा पीक शिखर सर केले. २५ दिवसांची ही मोहीम ऑक्सीजनशिवाय फत्ते करणारा अशोक हा पहिला भारतीय अपंग ठरला आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, यासाठी लागणारा खर्च ३५ लाख रुपये आहे.