29 January 2020

News Flash

विधिमंडळाच्या आदेशाला आरोग्य विभागाकडून हरताळ!

आदेशात दुपारनंतरचे नमूद असल्याने ते सकाळीच काढल्याची चर्चा आहे.

अधिवेशन सुरू असतानाच कर्मचारी कार्यमुक्त

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच १७ डिसेंबरच्या दुपारी आमदार निवासातील दवाखान्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा प्रताप सार्वजनिक आरोग्य विभागाने केला. त्यावरून विधिमंडळाच्या आदेशाला आरोग्य विभागाकडून हरताळ फासल्या गेला काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नागपूरचे हिवाळी अधिवेशन ५ डिसेंबरपासून सुरू झाले. यंदाही आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागासह वैद्यकीय शिक्षण विभागाकडे होती. या सेवेकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाने रविभवन, विधानभवन व आमदार निवासात २४ तास तर सुयोगसह १०७ खोल्यांच्या गाळे परिसरात दिवसा १२ तासांकरिता फिरते रुग्णालय उपलब्ध केले. सगळयाच ठिकाणी सेवा देण्याकरिता १२ फिजिशियन, ४८ वैद्यकीय अधिकारी, ३० परिचारिका, ६ ईसीजी तंत्रज्ञ, ८ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १८ रुग्णवाहिका, ३२ परिचरांची नियुक्ती झाली. विधिमंडळ सचिवांकडून ही सेवा २२ डिसेंबपर्यंत ‘जैसे थे’ ठेवायची होती.

आरोग्य उपसंचालक कार्यालयातून १७ डिसेंबरला अधिवेशन रात्री ८.२० वाजता स्थगित करण्यापूर्वीच दुपारी आमदार निवासातील दवाखान्यातील परिचर, कक्ष परिचरसह सगळ्याच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. आदेशात दुपारनंतरचे नमूद असल्याने ते सकाळीच काढल्याची चर्चा आहे. त्यावरून विधिमंडळाच्या आदेशाला हरताळ फासल्या गेला काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रत्येक वर्षी आमदार निवासाबाहेर राहणाऱ्या आमदारांसह अधिकाऱ्यांचे तिकीट आरक्षित न झाल्यास ते काही दिवस थांबतात. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यास त्यांच्यावर उपचाराकरिता डॉक्टर असले तरी मदतनीस न मिळाल्यास विलंबाने उपचार मिळून काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कार्यमुक्त करण्याच्या आदेशावर आरोग्य उपसंचालकांऐवजी इतर अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केल्याचीही चर्चा आहे. या विषयावर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, संचालक डॉ. सतीश पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, विधिमंडळाच्या आरोग्य सेवेचे नोडल अधिकारी डॉ. संजय मानेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

प्रकरणाची चौकशी करा

आमदार निवासातील दवाखाने २२ डिसेंबपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश असताना चतुर्थश्रेणी कर्मचारी अधिवेशन सुरू असतानाच काढण्याचा प्रकार अयोग्य आहे. शासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे. या प्रकरणात लवकरच आरोग्यमंत्र्यांना निवेदन सादर केले जाईल.

– त्रिशरण सहारे, अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्यसेवा कर्मचारी संघटना, नागपूर.

First Published on December 18, 2016 1:51 am

Web Title: health department ignore maharashtra assembly order
Next Stories
1 ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखाने राणे रागावले
2 एल्फिन्स्टन रोड आता प्रभादेवी 
3 ‘पेटीएम’च्या नावाने चिनी कंपनीचा फायदा करण्याचा प्रयत्न – पृथ्वीराज चव्हाण