|| राखी चव्हाण 

सर्वेक्षणातील निष्कर्ष; दहा शहरांमध्ये अभ्यास :- पालक आणि पाल्य एकमेकांपासून दूर राहण्याचे प्रमाण भारतात वाढत आहे आणि कुटुंबात आरोग्याशी संबंधित चिंताही वाढत असल्याचा निष्कर्ष ‘भारतीय पालक काळजी सर्वेक्षणात’ दिसून आला आहे. आरोग्याबाबतीत पालक आणि पाल्यांची मते वेगवेगळी असल्याचादेखील निष्कर्ष यात काढण्यात आला आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात भारतातील दहा शहरे आणि २००० पालक-पाल्यांचा यात समावेश होता.  वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या दोन पिढय़ांना जोडणारे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असले, तरीही पालकांपासून दूर राहणाऱ्या मुलांना त्यांच्या आईवडिलांची चिंता असते.

भारतातील सुमारे दहा शहरात आणि दोन हजार नागरिकांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. सुमारे ८६ टक्के पाल्य त्यांच्या आईवडिलांच्या आरोग्याच्या काळजीत असतात, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मात्र पालक तंदुरुस्त राहण्यासाठी फारसे प्रयत्न करीत नसल्याची तक्रार ६० टक्के मुलांनी केली आहे. ५९ टक्के पालकांच्या मते ते नियमित चालण्याचा व्यायाम करतात. तर ३० टक्के पालकांनी घरकामातच त्यांच्या व्यायाम होत असल्याचे आणि १८ टक्के पालकांनी योगा आणि इतर व्यायाम प्रकाराचा अवलंब करत असल्याचे सांगितले. आरोग्याबाबत पालक आणि पाल्यांची मते वेगवेगळी आढळली. भारतातील केवळ ३३ टक्के पालक दर सहा महिन्यांतून एकदा आरोग्य तपासणी करून घेतात. त्यातील ५४ टक्के पालकांना अजूनही आरोग्य तपासणीच्या वेळी त्यांची मुले जवळ असावी असे वाटते.

पालकांच्या आरोग्याच्या बाबतीत वैद्यकीय आणीबाणी निर्माण झालीच तर आईवडिलांपासून दूर राहणारे सुमारे ६५ टक्के पाल्य मित्र आणि शेजाऱ्यांची मदत घेतात. ११ टक्के पाल्य त्यांच्या पालकांपर्यंत शक्य तितक्या लवकर पोहोचण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र ५० टक्क्याहून अधिक पालकांनी या परिस्थितीत पाल्य उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितले.

आर्थिक बाबींचा विचार केल्यास ७१ टक्के पाल्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या तातडीच्या वैद्यकीय गरजांसाठी तरतूद करण्याचा विचार व्यक्त केला. तर केवळ २८ टक्केच पाल्य त्यांच्या आईवडिलांसाठी ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा सेवा घेण्यासाठी सज्ज आहेत.

या सर्वेक्षणानुसार ४७ टक्के पाल्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या वैद्यकीय आणीबाणीसाठी व गरजांसाठी आर्थिक नियोजन केले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या गरजा, पालक व अपत्ये यांचे आधुनिक नाते आणि पालकांची देखभाल करण्यासाठी व अपत्यांना चिंता मिटवण्यासाठी आवश्यक असलेली मदत यातील तफावत या गोष्टी सर्वेक्षणाच्या निमित्ताने समोर आल्या. यात ९९८ पालक आणि १००२ पाल्यांचा समावेश होता.

अनेक युवक स्वत:चे करिअर घडविण्यासाठी आणि व्यावसायिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दूरदेशी जातात. मात्र, आईवडिलांच्या आरोग्याचा विचार त्यांच्या मनात सतत असतो. त्यामुळे पालकांच्या देखभालीविषयी असलेली चिंता जाणून घेण्याचा प्रयत्न भारतीय पालक काळजी सर्वेक्षणात करण्यात आला. – मयंक बथवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, एबीएचआयसीएल

आमची दोन्हीही मुले परदेशात राहतात, पण दोघेही दररोज भ्रमणध्वनीवरून आमच्याशी संपर्क साधतात. अगदी मध्यंतरी माझ्या पायाची समस्या उद्भवली. त्यावेळी त्यांनी तातडीने इंटरनेटवर सगळे डॉक्टर्स, उपचारपद्धती शोधून सर्व व्यवस्था केली. त्यामुळे मुले दूर असली तरीही अजूनही आपली काळजी घेतात हे बघून खूप आनंद होतो. -उषा देशपांडे, नागपूर</strong>