नागपूर : नक्षलवादी प्रा. जी.एन. साईबाबाला १९ प्रकारचे आजार असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्या आजारांवर दिल्ली किंवा हैदराबाद येथील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी तीन ते चार महिन्यांकरिता जामीन देण्यात यावा, असा विनंती अर्ज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दाखल करण्यात आला. या अर्जावर न्या. प्रदीप देशमुख आणि न्या. रोहित देव यांनी सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला.

२८ ऑगस्ट २०१३ ला पोलिसांनी अहेरीच्या बसस्थानकावरून हेम मिश्रा, महेश तिरकी आणि पांडू नरोटे या तिघांना अटक केली. त्या प्रकरणी साईबाबासह इतर आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली असून ते कारागृहात आहेत. दरम्यान, साईबाबाने गालब्लाटर व इतर आजारवर शस्त्रक्रिया करण्यासाठी जामीन मिळण्याकरिता अर्ज केला. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. कारागृह प्रशासनाने उपचार करण्याची तयारी दर्शवली. पण, साईबाबाने खासगी डॉक्टरकडूनच उपचार करण्याचा हट्ट धरल्याने न्यायालयाने सुपरस्पेशालिटी रुग्णालयात खासगी डॉक्टरकडून उपचार करण्याची अनुमती दिली. त्यानंतर खम्मचे डॉ. एम.एफ. गोपीनाथ यांनी त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करून अहवाल सादर केला. त्या आधारावर साईबाबाच्या वकिलांनी १९ आजार असून त्यावर हैदराबाद किंवा दिल्लीत उपचार करण्यासाठी तीन ते चार महिन्यांकरिता जामीन मिळण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला. साईबाबातर्फे अ‍ॅड. बरुण कुमार आणि सरकारतर्फे अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी बाजू मांडली.