पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

नागपूर : हर्बल हुक्काच्या नावाखाली शहरातील अनेक रेस्टॉरेंटमध्ये तंबाखूजन्य हुक्काचा गोरखधंदा पुन्हा सुरू झाला असून पोलिसांचेही याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर येत आहे.

केंद्र सरकारने सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून तंबाखूजन्य हुक्का पार्लरवर बंदी घातली होती. ही सुधारणा गेल्यावर्षीपासून अंमलात आली. त्यानंतर शहरातील कॅफेच्या नावाखाली सुरू करण्यात आलेले अनेक हुक्का पार्लर बंद पडले. हुक्का पार्लरची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असून अंमली पदार्थाच्या दिशेने पडणारे हे पहिले पाऊल आहे. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे अनेक विद्यार्थी व तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून हुक्का पार्लर संचालकांनी अचानक कमाई बंद झाल्याने न्यायालयाचे दार  ठोठावले. मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी एका खटल्यात तंबाखूजन्य हुक्का पार्लरवर बंदी असताना रेस्टॉरेंट व कॅफेमध्ये हर्बल हुक्का पुरवण्याची परवानगी एका रेस्टॉरेंटच्या मालकाला दिली. या आदेशाचा फायदा घेऊन आता शहरातील हुक्का विक्रेते एकवटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हुक्का पार्लर संचालक पोलीस ठाण्यांमध्ये चकरा मारून हुक्का पार्लर चालवण्याची परवानगी मागत आहेत. पण, पोलीस अधिकारी स्वत:ला वाचवण्यासाठी परवानगी न देता आडमार्गाने त्यांना हुक्का विकण्यास सांगत आहेत. यातून चिरीमिरी घेऊन अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यात येत आहे.

या भागात सर्वाधिक मागणी

सदर, अंबाझरी, बजाजनगर आणि सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठय़ा प्रमाणात महाविद्यालयीन तरुणाईचा वावर आहे. या भागात राहणारा मोठा वर्ग गर्भश्रीमंत आहे. अशा परिस्थितीत या भागात हुक्कासारख्या व्यवसायाला प्रचंड मागणी असून काही ठिकाणी अवैधरित्या हुक्का पुरवला जात असून पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. मंगळवारी परिसरातील पोलीस आयुक्त कार्यालयापासून ८०० मीटर अंतरावरच एका ठिकाणी हुक्का विक्री सुरू असल्याने एकंदर पोलीस कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

हर्बलच्या नावाखाली हुक्का पार्लर सुरू झाले असतील व त्या ठिकाणी तंबाखूजन्य हुक्का पुरवला जात असेल, तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. कुठे असा प्रकार सुरू असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.

– नीलेश भरणे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे.