करोना चाचणीच्या निर्णयाआधीच अनेक प्रवासी नागपुरात;  ‘लोकसत्ता’ने आधीच सतर्क केले होते

दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा  या राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या नवीन प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी व नकारात्मक अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. परंतु या निर्णयाच्या काही दिवसांपूर्वीच या राज्यातून नागपुरात अनेक प्रवासी आले. त्यांचीही चाचणी करणार काय, केल्यास  त्यांना शोधणार कसे, हा मोठाच प्रश्न आहे.

दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यांत हल्ली करोनाबाधित वाढले आहेत. त्यामुळे तेथे करोनाची दुसरी- तिसरी लाट आल्याचे संकेत मिळत आहेत. दिल्लीतून अनेक जण रेल्वे व विमानाने नागपूरला येत असल्याने येथेही संक्रमणाचा धोका असल्याचे ‘लोकसत्ताने’ पुढे आणले होते. आता शासनाने खबरदारी म्हणून  चार राज्यातून नव्याने विमान, रेल्वे, रस्तेमार्ग येणाऱ्यांना प्रवासाच्या ९६ तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी व त्याचा नकारात्मक अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य केले आहे.

हा निर्णय होण्यापूर्वी व या चार राज्यात रुग्णवाढ होत असतानाच्या काळातही तेथून नागपूर  शहर व ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने प्रवासी आले आहेत. यापैकी अनेकांची माहिती प्रशासनाकडे नाही. आधीच आलेल्या या प्रवाशांपैकी कुणाला करोना असल्यास त्यांच्यापासून शहरात अनेकांना संक्रमणाचा धोका नाकारता येत नाही.

त्यातून पुन्हा साखळी तयार होऊन येथेही दुसऱ्या लाटेचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शासनाच्या निर्णयामुळे आता नव्याने राज्यात येणाऱ्या प्रवाशांची चाचणी होणार असली तरी यापूर्वी नागपुरात आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांचीही चाचणी होणे गरजेचे आहे. परंतु यापूर्वी शहरात आलेल्यांचा नाव- पत्ता मिळवत त्यांचा शोध घेण्याचे मोठे आवहन प्रशासनापुढे उभे ठाकणार आहे.

विमानतळ, रेल्वेस्थानक, रस्त्यांवर तपासणी

परराज्यातून नागपुरात आलेल्या प्रवाशांची आता येथील विमानतळ, रेल्वेस्थानक, रस्त्यांवरील विविध पथनाक्यांवर  तपासणी होणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी त्याबाबत मंगळवारी वेगवेगळे आदेश काढले आहेत. त्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी नागपुरातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभागातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या विमानतळावर महापालिकेचे पथक असून, रेल्वेस्थानकावर रेल्वे रुग्णालयाचे पथक राहणार आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाला रेल्वेने आलेल्या व येणाऱ्या प्रवाशांची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्याचीही सूचना करण्यात आली आहे. त्यांना शोधून चाचणी केली जाईल. सोबत सावनेर (छिंदवाडा, भोपाळ रोड), नरखेड (सावरगाव रोड, मोवाड), रामटेक या रस्तेमार्गाने नागपुरात दाखल होणाऱ्या सीमाक्षेत्रावरही तपासणी चौकी करून प्रवाशांची चाचणी व आरटीपीसीआर चाचणीबाबतचे आदेश देण्यात आाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.