आदिवासी समाजात नाराजी, आंदोलनाचा इशारा

नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या नामकरणाचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. या प्राणिसंग्रहालयाला दिवं. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आल्याने आदिवासी समाजात प्रचंड नाराजी आहे. हे नामकरण त्वरित मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा आदिवासी समाजाने दिला आहे.

नागपूर नगरीची स्थापना ३५० वर्षांपूर्वी गोंड राजे बख्त बुलंद शहा यांनी के ली. त्यामुळे या शहरासह विदर्भातील सर्वच जिल्हे आणि परिसर गोंडवाना प्रदेश म्हणून ओळखला जातो. ऐतिहासिकदृष्टय़ा गोंडवाना प्रदेशाला आदिवासी संस्कृ तीची किनार लाभली आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाची निर्मिती ज्याठिकाणी करण्यात आली,  त्या क्षेत्रातील तलावदेखील गोंडवनातील महाराजांच्या काळातील आहे. याच कारणामुळे  आदिवासी समुदायाकडून  गोंडवाना आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असे त्याचे नामकरण करण्याची मागणी वेळोवेळी  करण्यात येत होती. या प्राणिसंग्रहालयाचा एक भाग असलेल्या भारतीय सफारीचे उद्घाटन अवघ्या सहा दिवसांवर आले असताना या संपूर्ण प्रकल्पाच्या नामकरणाचा घाट घालण्यात आला. प्राणिसंग्रहालयाच्या निर्मितीपासून आदिवासी समाजाकडून होणारी मागणी लक्षात न घेता १९ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असे नामकरण करण्याचा शासन निर्णय प्रसिद्धही करण्यात आला. यामुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. हा  निर्णय मागे न घेतल्यास येत्या २६ जानेवारीला भारतीय सफारीच्या उद्घाटनाच्या दिवशी काटोल टोल नाका येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.  मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उपाध्यक्ष विजय परतेकी, महासचिव स्वप्निल मसराम, सुरेंद्र नैनाम, सहसचिव राहुल मडावी आदी आदिवासी समाजबांधवांनी दिला आहे.

विदर्भवाद्यांचाही विरोध

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला दिवं. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास विदर्भवाद्यांनीही विरोध के ला आहे. दिवं. ठाकरे विदर्भविरोधी होते आणि शिवसेनेचाही वेगळ्या विदर्भाला विरोध आहे. असे असताना प्राणिसंग्रहालयाला त्यांचे नाव देणे हा विदर्भवाद्यांचा अपमान आहे. त्यांच्याऐवजी विदर्भातील कोणत्याही नेत्याचे नाव गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला द्यावे, अशी मागणी करत विदर्भवाद्यांनी शासन आदेशाची होळी केली. हे नामकरण त्वरित मागे न घेतल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्घाटनाला येतील तेव्हा काळे झेंडे दाखवून विरोध करू, अशा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे राम नेवले यांनी दिला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रती आदिवासी समुदायला आदर आहे. त्यांचे नाव उद्यानाला न देता इतरत्र कु ठेही दिल्यास समाजाची हरकत नाही. उलट आम्ही त्याचे स्वागत करू. मात्र, गोंड राजाची निर्मिती असलेल्या गोरेवाडा तलाव आणि परिसरात हे प्राणिसंग्रहालय उभारले आहे. समाजाच्या भावना याठिकाणाशी जुळल्या आहेत. त्यामुळे या प्राणिसंग्रहालयाचे नामकरण गोंडवाना आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असे करायला हवे.

– दिनेश शेराम, अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद