‘मेडिकल, मेयो, सुपर’चे निवासी डॉक्टर रजेवर; संतप्त डॉक्टरांची मेडिकलमध्ये निदर्शने

राज्याच्या विविध भागात डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचा निषेध करत मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी सोमवारी बेमुदत सामूहिक रजा आंदोलन केले. त्यामुळे शंभरावर किरकोळ शस्त्रक्रिया स्थगित होण्यासह रुग्णसेवा विस्कळीत झाली होती. निवासी डॉक्टरांनी मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयात जोरदार निदर्शने केली. प्रशासनाने आवश्यक तयारी केल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली नसल्याचा दावा केला असला तरी नातेवाईकांनी अनेक वार्डात डॉक्टरही नसल्याचा आरोप केला आहे.

शासकीय व खासगी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत शासन सुरक्षेसाठी काहीच करत नसल्याचा आरोप करून सोमवारी सकाळी ८ वाजतापासून मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी, डॉ. आंबेडकर रुग्णालयातील संतप्त निवासी डॉक्टरांनी विविध मागण्या पुढे करीत बेमुदत सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. त्यामुळे चारही रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडली. प्रशासनाकडून रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून वरिष्ठ निवासी डॉक्टरांपासून प्राध्यापकांपर्यंत सगळ्यांना बाह्य़रुग्णसेवेपासून आंतररुग्ण सेवेकरिता लावण्यात आले होते. वरिष्ठ डॉक्टरांमुळे गंभीर संवर्गातील काही शस्त्रक्रिया सोडल्या तर बहुतांश शस्त्रक्रिया झाल्या.

संपामुळे सुपरस्पेशालिटीत हृदयाच्या एकही एंजोग्राफी झाली नसून केवळ एकच एंजोप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्याचे सूत्रांनी सांगितले. येथे युरोलॉजीच्या २, मेंदूरोग विभागाची केवळ एकच शस्त्रक्रिया झाल्या. मध्य भारतात या शस्त्रक्रिया केवळ येथेच होत असताना त्या फार कमी झाल्याने रुग्णांना प्रचंड मन:स्ताप झाला. शहरातील सगळ्याच रुग्णालयांच्या बाह्य़रुग्ण विभागातही अनेक उपचार घेतलेल्या रुग्णांना विविध तपासणीचे अहवाल डॉक्टरांमुळे मिळाले नाही.

प्रशासनाच्या माहितीनुसार मेडिकलमध्ये ३४७ निवासी डॉक्टर असून त्यातील ३०० जण सामूहिक रजा आंदोलनात सहभागी झाले. मेयोतही सुमारे १५० निवासी डॉक्टरांपैकी शंभरावर निवासी डॉक्टर रजेवर गेल्याची माहिती आहे. दरम्यान, मेडिकल प्रशासनाकडून येथे अधिव्याख्याता ते प्राध्यापक असे ३७० अधिकारी व वरिष्ठ निवासी डॉक्टरांची संख्या ६९ असल्याने येथे फारसा परिणाम जाणवला नसल्याचा दावा करण्यात आला. मेडिकल, मेयोसह सुपरच्या अनेक वार्डात डॉक्टर नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यातच दुपारी मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयात निवासी डॉक्टरांनी जोरदार निदर्शने करत सुरक्षा वाढवण्यासह विविध मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली.

मेडिकलची एकही शस्त्रक्रिया स्थगित होऊ नये म्हणून विभागप्रमुखांना काळजी घेण्याच्या सूचना देत आवश्यकता असलेल्या भागात डॉक्टर दिल्या गेले होते. रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून सगळ्यांनी सोमवारी राऊंड घेत रुग्णसेवा दिली. त्यामुळे सामूहिक रजेचा काही परिणाम जाणवला नाही. येथे दुपारी ३ वाजेपर्यंत नेत्राच्या २०, गायनिकच्या ५, अस्थिरोग विभागात ५, ट्रामात ३, कान-नाक-घसा विभागात ४, ओटी-सी मध्ये ३ शस्त्रक्रिया झाल्या. बाह्य़रुग्ण विभागातही २ हजार ८३३ रुग्णांवर उपचार झाले असून ९२ रुग्णांना दाखल करण्यात आले.

– डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल.

 

‘सुपरस्पेशालिटी’चे प्रशासन हरवले

सुपरस्पेशालिटी रुग्णालयात विशेष कार्य अधिकारी पदावर डॉ. मनीष श्रीगिरीवार असताना ते सकाळी लवकर येऊन विविध विभागाचा राऊंड घेत रुग्णांच्या समस्या ऐकायचे. वेळीच ते त्या सोडवण्याचे प्रयत्नही करायचे, परंतु शासनाने त्यांची यवतमाळ येथे बदली केल्यावर येथे हा पदभार डॉ. मुकुंद देशपांडे यांच्याकडे दिला गेला आहे, परंतु ते कार्यालयात एक वा दोन तासच बसत असल्याने नातेवाईकांना भेटत नाही. तेव्हा येथील प्रशासन हरवल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. निवासी डॉक्टरांच्या संपाच्या दिवशी परिस्थिती जाणण्याकरिता पत्रकार त्यांना भेटायला गेले असता त्यांनी त्यांनाही टाळत माहिती लपवण्याचा प्रयत्न केला.

मेयोतील पदवी व पदव्युत्तरच्या जागा धोक्यात

भारतीय वैद्यक परिषद (एमसीआय)चे पथक सोमवारी अचानक पदवी व पदव्युत्तरच्या विविध त्रुटीची पहाणी करण्याकरिता मेयोत पोहचले. बांधकामासह विविध त्रुटी कायम असण्यासह विद्यार्थी नसल्याचे बघत त्यांनाच धक्का बसला, परंतु प्रशासनाने कसेतरी विभाग प्रमुख व शिक्षकांच्या मदतीने समितीपुढे विद्यार्थ्यांना उभे केले. मात्र अनेक त्रुटी कायम असल्याने येथील जागांची संख्या कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच मेयोच्या अधिष्ठात्यांना संपाबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी माहिती नसल्याचे सांगत एमसीआयचे निरीक्षण सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, मेयोतील प्रत्येक शिक्षकांसह विद्यार्थ्यांची एमसीआयने व्हिडीओ रेकॉर्डिगमध्ये मोजणी करत विविध नोंदी तपासल्या.