प्रवाशांची ऐनवेळी धावाधाव

प्रवासी गाडी येण्याची प्रतीक्षा करीत असतात, उद्घोषणेनुसार प्रवासी फलाट क्रमांक सहावर उभे असतात आणि गाडी येताच  बोगीकडे धाव घेतात, पण काही प्रवाशांना त्यांची बोगीच दिसत नाही. त्यानंतर प्रवासी टीटीईकडे विचारणा करतात. ते दोन बोग्या नसल्याचे सांगतात. त्यामुळे  प्रवाशांमध्ये गोंधळ उडतो. नंतर प्रवाशांना इतर बोगींमध्ये सामावून घेण्यास सांगण्यात येते. ही घटना सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास इतवारी रेल्वेस्थानकावर बिलासपूर इंटरसिटीमध्ये घडली आणि रेल्वे प्रशानाचा घोळ पुन्हा चव्हाटय़ावर आला.

नागपूर-बिलासपूर एक्स्प्रेस इतवारी रेल्वेस्थानकावरून सकाळी साडेसहाच्या सुमारास सुटणार होती. त्यामुळे प्रवासी सकाळी सहा पासून स्थानकावर आले होते. सव्वासहाच्या सुमारास गाडी फलाट क्रमांक सहावर आली. प्रवासी त्यात चढू लागले. मात्र, काही प्रवाशांना त्यांना मिळालेल्या क्रमांकाच्या बोगी (बी३ आणि बी४) गाडीला लागलेल्या नाही असे आढळून आले. रक्षाबंधनाचा सण ओटोपून परतणाऱ्या अनेक महिला लेकरांसह प्रवास करीत होत्या. त्यांना ऐनवेळी बोगी बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सामान आणि मुलांना सांभाळत पुन्हा इतर बोगीकडे धाव घ्यावी लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. ऐनवेळी दोन बोगी नसल्याने सांगण्यात आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. प्रवाशांना बी१ व बी२ बोगी तसेच स्लिपर क्लासमध्ये सामावून घेण्यात आले.

फलाट क्रमांक ६ वर प्रवाशांची कोंडी

इतवारी रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक ६ ची रुंदी कमी आहे. येथे येणारी गाडी, परत त्याच दिशेने परत जाते. त्यामुळे उतरण्याची आणि गाडीत चढणाऱ्यांची गर्दी होते. अरुंद फलाट आणि बाजूला संरक्षण भिंत असल्याने अनेकदा रेटारेटीच्या घटना घडल्या आहेत.  प्रवाशांना स्थानकाबाहेर पडण्यास कसरत करावी लागते. अशा स्थितीत चेंगराचेंगरीच्या घटनांना निमंत्रण देण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे फलाटाची रुंदी वाढवणे आवश्यक आहे. आज सकाळी सव्वाच्या सुमारास फलाटावर प्रवाशांची गर्दी उसळली. त्यामुळे वयोवृद्ध व मुलांची कोंडी झाली होती.

गाडी फलाटावर येण्यापूर्वी पीएनआर स्थिती जाणून घेतली, तेव्हा बी४ मध्ये बर्थ क्रमांक १ आणि ४ मिळाले होते, परंतु या क्रमांकाची बोगी नव्हती. नंतर त्यांनी बी१ मध्ये बसण्यास सांगितले आणि थोडय़ावेळाने भ्रमणध्वनीवर एसएमएस आले. त्यात बोगी क्रमांक बीएन आणि बर्थ क्रमांक ६१ व ६२ असे नमूद होते. रेल्वे बर्थ वितरित करताना केलेल्या चुकीमुळे प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागला

– दीपक जोशी, प्रवासी