• पहिल्या टप्प्यातील कामेच अपूर्ण
  • ताप सिमेंट रस्त्यांचा

महापालिकेतील सत्ताधारी, अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात सुसूत्रतेचा अभाव असल्याने आणि जबाबदारी परस्परांवर ढकलण्याची कार्यप्रणाली या सर्वानी अवलंबिली असल्याने त्याचा फटका शहरातील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाला बसला असून त्याला चार महिने ते वर्ष असा प्रचंड विलंब होत आहे.

शहरात सिमेंट रस्त्यांची दोन टप्प्यात कामे सुरू आहेत. यापैकी एकही टप्पा पूर्ण झालेला नाही. पहिल्या टप्प्यात ३० आणि दुसऱ्या टप्प्यात ५९ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. रस्त्यांची कामे सुरू झाल्यानंतर ती वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. आयुक्तांनी सिमेंट रस्ते बांधकामाची पाहणी केल्याचे आणि काम वेळेत पूर्ण न करणाऱ्यांना ताकीद दिल्याचे ऐकिवात नाही. कुठे रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत, तर कुठे काम अर्धवट सोडून देण्यात आले. यामुळे नवीन रस्ता होत असल्याच्या आनंदापेक्षा त्याविषयी नाराजी अधिक व्यक्त होताना दिसत आहे. अधिकारी, पदाधिकारी आणि कंत्राटदार विलंबाची वेगवेगळी कारणे पुढे करीत असून परस्परांवर जबाबदारी ढकलत आहेत. दुसरीकडे दिलेल्या मुदतीत कामे करवून घेण्यासाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या दैनंदिन कामाचा प्रगती अहवाल घेणारी यंत्रणा नाही. कंत्राटदारावर राजकीय वरदहस्त, अधिकाऱ्यांची उदासीनता आणि कंत्राटदाराची मुजोरी यामुळे सिमेंट रस्त्यांची कामे महिनोंमहिने चालत असल्याने जनता त्रस्त आहे.

महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार पहिल्या टप्प्यातील सर्व कामे एकाच कंत्राटदाराकडे देण्यात आली आहेत. रस्ते रहदारीसाठी खुले करण्यात आले असले तरी त्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. संपूर्ण रस्ते जेव्हा होतील, तेव्हाच असे प्रमाणपत्र दिले जाईल. कामाच्या विलंबासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. राजकीय नेत्यांनी निवडणुकीआधी त्यांच्या भागात सिमेंट रस्त्याच्या कामाचे किमान भूमिपूजन तरी व्हावे यासाठी ताकद पणाला लावली, परंतु आता ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होताना दिसत नाही. कंत्राटदार विलंबासाठी वेगवेगळ्या तांत्रिक बाबी सांगून वेळ मारून नेत आहे. यातून एकच गोष्ट पुढे आली आहे ती राजकीय नेते, अधिकारी आणि कंत्राटदारांची बेफिकीरी आणि सर्वसामान्य जनतेला गृहित धरण्याची वृत्ती.

टप्पा-१

  • यामध्ये १०४ कोटी रुपयांचे ३० रस्त्यांचे कार्यादेश २०१५ मध्ये देण्यात आले. त्यापैकी १३ सिमेंट रस्त्यांची कामे झाली आहेत. त्यासाठी कंत्राटदाराला ४१ कोटी रुपये देण्यात आले. काम पूर्ण करण्याची मुदत २०१८ पर्यंत वाढवून देण्यात आली.

टप्पा-२

  • फेज-२ मध्ये २६० कोटी रुपयांचे ५९ रस्त्यांचे कार्यादेश २०१६ मध्ये देण्यात आले. त्यापैकी केवळ २७ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी ४० कोटी रुपये कंत्राटदारांना देण्यात आले. या टप्प्यातील कामे २०१९ पर्यंत पूर्ण करावयाची आहेत.

अपूर्ण रस्ते

  • आझाद बुनकर कॉलनी
  • सावरकर नगर चौक, अजनी चौक ते चुनाभट्टी अजनी रेल्वे (मेडिकल चौक)
  • सेंट्रल बाजार रोड ते व्हीएनआयटी ते लोकमत भवन चौक, पार्क रोड ते एस ए रोड ते एन ए रोड,
  • ग्रेट नाग रोड, धंतोली, आरओबी ते बैद्यनाथ चौक
  • राममनगर चौक ते लक्ष्मीभवन चौक ते व्हीआयपी मार्ग
  • मोक्षधाम ते एसटी स्टॅन्ड चौक
  • लकडगंज पोस्ट ऑफिस ते बरबटे चौक
  • चांभार नाला ते चारखंबा चौक ते टेका नाका कामठी रोड
  • मॉरेस कॉलेज टी पॉईंट चौक ते मानस चौक
  • ज्योती शाळा ते दिघोरी फ्लाय ओव्हर
  • सरदार पटेल चौक ते कॉटेन मार्केट चौक
  • मॉडेल मिल चौक ते फवारा चौक, नंदनवन ते ग्रेट नाग रोड
  • ईश्वर चौक ते शिवशंकर लॉन खरबी रोड

तांत्रिक कारणामुळे कामे रखडली

पहिल्या टप्प्यातील सर्व ३० रस्त्यांची कामे युनिटी इन्फ्रो कंपनीकडे आहेत. सर्व रस्ते २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ते रखडले आहेत. पैशासाठी कुठल्याही रस्त्याची कामे अडलेली नाहीत. काही ठिकाणी ओसीडब्ल्यूची कामे तर काही ठिकाणी मेट्रोची कामे सुरू असल्यामुळे रस्त्याची कामे मुदतीत पूर्ण करणे कठीण झाले आहे.

नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता, महापालिका