19 February 2020

News Flash

रेल्वे इंजिनवर आता तिरंग्यासोबत खाद्यपदार्थाची जाहिरात

ब्रिटिशांनी भारतात पहिली गाडी एप्रिल १८५३ ला मुंबईत बोरीबंदर ते ठाणे चालवली.

(संग्रहित छायाचित्र)

उत्पन्नवाढीसाठी खासगी कंपनीशी करार

रेल्वे इंजिनवर भारतीय तिरंगा ध्वजासोबतच खाद्यपदार्थाच्या जाहिराती लवकरच झळकणार असून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपुरातील एका खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या खासगी कंपनीशी इंजिनवर जाहिरात करण्याचा करार केला आहे.

रेल्वेने इंजिनवर तिरंगा साकारण्यास २०१६ मध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रारंभ केला होता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्यांदाच इंजिनच्या दर्शनी भागावर तिरंगा रंगवण्यात आला. त्यामुळे तत्कालीन मंत्री सुरेश प्रभू यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. प्रारंभी नागपुरातील अजनी आणि मोतीबाग येथील इंजिन देखभाल-दुरुस्ती केंद्राने ३८ इंजिनांवर तिरंगा साकारला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर इंजिनवरही तिरंगा दिसू लागला. आता रेल्वेने उत्पन्नवाढीसाठी एक्सप्रेस आणि मेल गाडय़ांच्या इंजिनवर जाहिरात प्रकाशित करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने निविदा मागवून इंजिनवर जाहिरातीचा मार्ग मोकळा केला. यासंदर्भात रेल्वे आणि मेसर्स हल्दीराम इंटरनॅशनल प्रा. लि. मध्ये करार झाला आहे. मध्य रेल्वे नागपूर विभागाने हल्दीराम इंटरनॅशनल प्रा. लि.ला पाच वर्षांकरिता पाच रेल्वे इंजिन (डब्ल्यूएपी-७ टाईप) जाहिरातीसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या कंपनीला खाद्यपदार्थ आणि मिठाईचा प्रचार मेल आणि एक्सप्रेस गाडय़ांच्या इंजिनवर करता येणार आहे. अजनी येथील इंजिन संपूर्ण देशभर वापरले जातात. त्यामुळे या कंपनीच्या उत्पादनाची जाहिरात सर्वत्र होईल. यातून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला प्रत्येक वर्षांला ५२ लाख ५६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. यासंदर्भातील पत्र वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी हल्दीराम इंटरनॅशनल प्रा. लि.चे कार्यकारी संचालक व्ही.एस. राव यांना दिले.

ब्रिटिशांनी भारतात पहिली गाडी एप्रिल १८५३ ला मुंबईत बोरीबंदर ते ठाणे चालवली. भारतात प्रवासी रेल्वे सुरू होण्यास १६३ वर्षे आणि स्वातंत्र्याला ६९ वर्षे झाल्यानंतर रेल्वे इंजिनांवर तिरंगा दिसू लागला. नागपुरातील अजनी विद्युत लोकोशेडमध्ये इंजिनांवर तिरंगा साकारण्यात आला. तिरंगा नेहमी स्वच्छ राहील, याची जबाबदारी  संबंधित इंजिनचालकाची असते. आता इंजिनवर खाद्यपदार्थ आणि मिठाई उत्पादनाचे चित्र दिसणार आहेत.

‘‘पहिल्या टप्प्यात पाच इंजिनांवर जाहिरात केली जाणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली होती. अजनी कार्यशाळेत देखभाल-दुरुस्तीसाठी येणाऱ्या इंजिनाच्या वेळापत्रकानुसार टप्प्याटप्प्याने जाहिरातीसाठी निविदा काढण्यात येईल. इंजिनवर जेथे कुठे मोकळी जागा असेल तेथे जाहिरात केली जाईल.’’ – एस.जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे.

First Published on September 7, 2019 5:02 am

Web Title: indian railway indian flag food akp 94
Next Stories
1 रिपाइं भाजपमध्ये कधीही विलीन करणार नाही-आठवले
2 फसवणुकीच्या गुन्ह्य़ात आरोपींना अजनी पोलिसांकडून लाभ!
3 गरजू रुग्णांसाठी प्रत्येक रुग्णालयांत मदत यंत्रणा हवी
Just Now!
X