* अ‍ॅन्टिबायोटिक औषधेही निरुपयोगी ठरू शकतात
* ‘मेयो’तील २९२ नवजात शिशूंच्या अभ्यासातील संशोधन
अनेक शिशूंमध्ये ‘ईएसबीएल’ आणि ‘एमबीएस’ हे जीवाणू आढळतात. जीवाणूंची प्रतिकारशक्ती वाढल्याने बऱ्याच अ‍ॅन्टिबायोटिक औषधे त्यांना प्रभावी ठरत नाही. त्यामुळे ही औषधे बदलावी लागतात. नागपूरच्या डॉ. गिरीश भुयार यांनी या शिशूंच्या रक्तातील संक्रमणावर डॉ. गोपाल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. त्यात बाळ जन्मल्याच्या ७२ तासानंतरच्या शिशूंच्या तुलनेत त्याहून कमी अवधीच्या बाळांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आढळले. हा अभ्यास मेयोतील २९२ शिशूंवर झाला. त्याची नोंद ‘नॅशनल जनरल ऑफ इंटिग्रेटेड मेडिसीन’मध्ये झाली आहे.
नॅशनल न्युओनॅटल पेरिनॅटल डायटाबेस प्रमाणे आपल्या देशातील प्रमुख सोळा रुग्णालयांमध्ये नवजात शिशूंच्या रक्तातील विषजंतू दोषाचे (रक्तदोष) प्रमाण दर एक हजार शिशूंमध्ये ३८ आहे. विकसित देशात हे प्रमाण १ हजार बाळांमागे १ ते १० आहे. अभ्यासात आढळले की, विकसनशील देशात दर वर्षांला साधारणत: ५० लाख नवजात शिशू वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्युमुखी पडतात. त्यातील ३० ते ५० टक्के बाळांच्या मृत्यूचे कारण विषजंतू दोष, हागवण, धनुर्वात हे आहे. साधारणत: २० टक्के नवजात बाळ संसर्गाने ग्रस्त होतात. त्यातील १ टक्के विषजंतू दोषाच्या संक्रमणाने दगावतात. न्युओनॅटल विषजंतू दोषाचे ७२ तासांच्या पूर्वी आणि ७२ तासांच्या नंतर असे दोन प्रकार आहेत.
७२ तासापूर्वीच्या गटातील बाळांना मातेकडून संक्रमणाची शक्यता जास्त असते. या शिशूंना न्युमोनिया किंवा श्वसनाचा त्रास असतो, तर ७२ तासांच्या नंतरच्या बाळांना जीवाणूंचे संक्रमण रुग्णालय किंवा परिसरातील अस्वच्छतेने होण्याची शक्यता जास्त असते. या शिशूंमध्ये मेंदूवरील आवरणाचा संसर्ग, छातीत संसर्गासारखे आजार संभावतात. नवजात शिशुंची प्रतिकार क्षमता कमी असते. त्याशिवाय त्यांच्यामध्ये विषजंतू दोषाची लक्षणे बऱ्याचदा दिसून येत नाही. तेव्हा या शिशूंची बारकाईने तपासणी गरजेची आहे. या शिशूंमध्ये शरीराचे तापमान वाढणे किंवा कमी होणे, दूध न घेणे, मंद पडणे, ह्रदयाचे ठोके कमी होणे किंवा वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे आढळतात.
रक्तातील साखर कमी होणे किंवा वाढणे, झटके येणे, जास्त प्रमाणात बाळ चिडचिड करतो, सतत झोपत राहणे, हगवण लागणे, ओकाऱ्या होणे, पोट फुगणे, कावीळ इत्यादी ही रक्तातील विषजंतू दोषाची लक्षणे असू शकतात. सोबत कमी वजनाचे बाळ, मातेमध्ये प्रसूतीच्या पूर्वी ताप, प्रसूतीदरम्यान दरुगधीयुक्त पाणी जाणे, चिमटय़ाद्वारे करण्यात आलेली प्रसूती, बाटलीद्वारे दूध पाजणे, नाळेच्या जखमेची योग्य काळजी न घेतल्यासही हा आजार संभावतो. विषजंतू दोषाची लक्षणे अस्पष्ट असल्यामुळे बाळाच्या काही चाचण्या आवश्यक ठरतात. त्यात रक्तातील जंतूला कोणते अ‍ॅन्टिबायोटिक प्रभावी ठरेल ही तपासणी महत्त्वाची आहे.
डॉ. भुयार यांनी या संशोधनांतर्गत मेयोतील २९२ मुलांवर अभ्यास केला गेला. त्यात १९० शिशू ७२ तासांच्या पूर्वीचे तर १०२ शिशू ७२ तासांच्या नंतरचे होते. या शिशूंमध्ये १८२ पुरुष आणि ११० शिशू स्त्री गटातील होते. त्यातील ५८.९१ मुलांचा जन्म रुग्णालयात, तर १४.३८ टक्के शिशूंचा जन्म घरी झाला. त्यात २१.९२ टक्के शिशूंचा जन्म सिझरणे तर ४.७९ टक्के शिशूंचा जन्म हा चिमटय़ाच्या मदतीने झाला.
एकूण शिशूंपैकी २०.५५ टक्के मुलांना आईपासून धोका झाल्याचे पुढे आले. त्यातच ७२ तासांपूर्वीच्या ५६ मुलांचा आणि ७२ तासानंतरच्या एकूण १५ मुलांचा मृत्यूही झाल्याचे पुढे आले.

अ‍ॅन्टिबायोटिक औषधांमध्येही संशोधन गरजेचे
संशोधनात काही नवजात शिशूंमध्ये आढळणाऱ्या जीवाणूंची प्रतिकारशक्ती वाढत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अनेक अ‍ॅन्टिबायोटिक औषधे त्यांना प्रभावी ठरत नाहीत. तेव्हा नियमितपणे अ‍ॅन्टिबायोटिक औषधांमध्ये संशोधन होऊन आणखी प्रभावी औषधांची निर्मिती सतत होत राहण्याची गरज आहे.
– डॉ. गिरीश भुयार,
सहायक वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), नागपूर</strong>