प्रांताध्यक्षांचा राजीनामा

विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या समर्थनार्थ त्यांचे समर्थक सक्रिय झाले आहे. परिषदेमध्ये घडलेल्या या घडामोडीमुळे प्रांताध्यक्ष विजयचंद वालिया यांनी राजीनामा दिला असून यामुळे येणाऱ्या दिवसात संघभूमीत विश्व हिंदू परिषदेमध्ये दोन गट पडणार असल्याची चिन्हे आहेत.

प्रवीण तोगडिया यांनी सरकारच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप आणि संघ वर्तुळात नाराजी होती. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेत तोगडिया यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर  टीका केली होती. तोगडिया यांच्या भूमिकेमुळे विहिंपच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल केले जाणार असल्याचे संकेत प्रतिनिधी सभेत देण्यात आले होते. दोन आठवडय़ापूर्वी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत  तोगडिया समर्थकांचा पराभव झाला. तोगडियांवर  झालेल्या अन्यायाच्या विरोधात विदर्भातील त्यांचे समर्थक  नाराज झाले.  त्यांचे खंदे समर्थक व प्रांताध्यक्ष आणि उद्योगपती विजयचंद वालिया यांनी पदाचा राजीनामा दिला. वालिया यांच्या राजीनाम्यानंतर तोगडिया यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी समर्थकांनी परिषदेच्या कार्यकर्त्यांना संघटित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. तोगडिया यांनी  विदर्भात संघटन बांधणी करताना जास्तीत जास्त युवकांना जोडण्यासाठी  उपक्रम राबवले. बजरंगदलमध्ये त्यांचा चाहता वर्ग आहे. येणाऱ्या काळात ते तोगडिया यांच्याकडे जाऊ नये, यासाठी परिषदेकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विष्णू कोगजे आणि अन्य पदाधिकारी आज नागपुरात आले होते. त्यांच्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने बुधवारी देवी अहल्या मंदिरमध्ये स्थानिक पदाधिकारी आणि परिषदेशी संबंधित कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विष्णू कोगजे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. तोगडिया  नागपुरात मे च्या पहिल्या आठवडय़ात  येणार असल्याची माहिती आहे.

विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष विजयचंद वालिया यांनी राजीनामा दिला. मात्र, विहिंपमध्ये दोन गट पडण्याची कुठलीही शक्यता नाही.   – हेमंत जांभेकर, विहिंप, प्रांत उपाध्यक्ष