भारतात वाघांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना वाघ आणि त्यांच्या अधिवास संवर्धनाचे मोठे आव्हान आहे. देशातील जंगलात आणखी काही वाघ सामावू शकतात. मात्र, त्यासाठी तुकडय़ातुकडय़ात विभागलेले जंगल जोडण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्याची आवश्यकता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तब्बल तीन हजार किमीचा प्रवास करून स्थिरावलेल्या ‘वॉकर’ च्या संवर्धनानंतर कॉरिडॉरचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील या वाघाने अवघा महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर अधिवासासाठी बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याची निवड केली. सुमारे तीन वर्षांच्या या वाघासाठी जोडीदाराचा शोध सुरू आहे. या वाघाची वंशवेल वाढण्यासाठी या क्षेत्रात वाघीण सोडली तरीही आवश्यक त्या सुविधा करणे आवश्यक आहे. एका वाघासाठी जोडीदार शोधून कॉरिडॉर निर्मिती आणि इतर सुविधा वनखात्याने निर्माण केल्यास संरक्षण, संवर्धनाच केंद्रबिंदू ठरवण्याच्या दृष्टीने ते देशातील पहिले पाऊल ठरेल.
ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावल्यनंतर या वाघाने २०५ चौरस किमीचा अधिवास निवडला आहे. नीलगाय आणि इतर तृणभक्षी प्राण्यांची तो शिकार करत आहे. याठिकाणी आता त्याची वंशवेल वाढवण्यासाठी वाघीण सोडण्याचा प्रयत्नात आहेत. या वाघावर लक्ष ठेवण्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठित करण्यात आली आहे. वाघाचे अस्तित्व असणाऱ्या क्षेत्रावर ते लक्ष ठेवून अहेत. त्यांनीही याठिकाणी वाघीण सोडण्याची शिफारस केली आहे. मात्र, हे अभयारण्य एखाद्या बेटासारखे असल्याने मोठे आव्हानही आहे.
‘वॉकर’च्या रुपाने ज्ञानगंगा अभयारण्याचा विकास आणि त्या अनुषंगाने रोजगारही निर्माण होईल. मात्र, त्याआधी याठिकाणी सुविधा तयार कराव्या लागणार आहेत. इतर जंगलांना जोडणारा कॉरिडॉर तयार करावा लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानीचा व्याघ्रसंचार असणारा परिसर ज्ञानगंगाला जोडला जाऊ शकतो. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य आणि वाशीम जिल्ह्यातील कारंजा सोहोळच्या बाबतीत मात्र अडचणी येऊ शकतात. दरम्यान या वाघाचा प्रवास जोडीदाराच्या शोधासाठी होता की आणखी काही कारणांसाठी हे एक रहस्य आहे. कारण वाघांसाठी त्याचा अधिवास आणि खाद्यान्न प्राधान्यक्रमावर असतात. आताही त्याने जागा आणि अन्न मिळाल्यामुळेच ज्ञानगंगाची निवड केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो येथे स्थिरावला आहे. ज्ञानगंगाला व्याघ्रक्षेत्र घोषित करण्यासाठी राजकीय दबाव वाढत आहे. या वाघाचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी ५० किलोमीटरचा खामगाव-बुलढाणा मार्ग तोडण्याचा पर्याय देखील समोर आणला आहे. मात्र, त्याआधीच या वाघाच्या आणि ज्ञानगंगाच्या संवर्धनासाठी कॉरिडॉर निर्मितीकरिता दोन पर्याय शिल्लक आहेत. महाराष्ट्रात कॉरिडॉर खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, या वाघासाठी कॉरिडॉर तयार होत असतील तर ही एक मोठी घडामोड ठरेल.