दोन महिन्यांत २२ रुग्णांची नोंद; एकाचा मृत्यू

नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ांमध्ये ‘स्वाईन फ्लू’वर नियंत्रण मिळवणे कठीण जात असतानाच आता जपानी मेंदूज्वरनेही डोके वर काढले आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१९ या दोन महिन्यात जपानी मेंदूज्वरच्या २२ रुग्णांची नोंद झाली असून मेडिकलमध्ये उपचारादरम्यान एक मुलगाही दगावला आहे. या आजाराचे रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले असून त्यांच्या एका चमूने दगावलेल्या रुग्णाच्या गोंदिया जिल्ह्य़ातील गावाचे निरीक्षणही केले आहे.

शुभम उमेश साहिल (१३) रा. सिलापूर, देवरी, गोंदिया असे मृत रुग्णाचे नाव आहे. नागपूर विभागात रानडुकरांची संख्या मोठी आहे. हा प्राणी जपानी मेंदूज्वरच्या विषाणूचा वाहक आहे. या डुकराला चावा घेतलेले डास मानवाला चावल्यास जपानी मेंदूज्वरची लागण होते. जानेवारी २०१९ पासून नागपूर विभागात या आजाराचे रुग्ण आढळणे सुरू झाले होते. हळूबळू फेब्रुवारीपर्यंत रुग्णसंख्या २२ वर पोहोचली आहे. त्यात गोंदियातील १३ जणांचा समावेश आहे. तेथील एका १३ वर्षीय मुलाचा फेब्रुवारीत या आजाराने मृत्यू झाला होता. आरोग्य उपसंचालक कार्यालयात मृत्यू अंकेक्षण समितीच्या बैठकीत हा मृत्यू जपानी मेंदूज्वरने झाल्यावर शिक्कामोर्तब झाले. या आजाराचे गडचिरोलीतही नऊ रुग्ण आढळले होते. दरम्यान, नागपूर विभागात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीतही जपानी मेंदूज्वराचे ५२ रुग्ण आढळले होते. यातील एकाचा मृत्यू झाला होता, परंतु यंदा दोन महिन्यातच रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागही हादरला आहे.

गोंदियात नमुने तपासण्याची सोय नाही

गेल्या दोन महिन्यात पूर्व विदर्भात जपानी मेंदूज्वरचे सर्वाधिक रुग्ण गोंदिया जिल्ह्य़ात आढळले असतानाही तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये अद्यापही या आजाराच्या रुग्णांचे नमुने तपासण्याची सोय नाही. त्यामुळे हे नमुने नागपूरला आणावे लागत आहेत. आरोग्य विभागाकडून नमुने तपासणाऱ्या यंत्रणेला प्रत्येक वर्षी सुमारे १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. त्यानंतरही तेथे तपासणी होत नाही.

नागपूर विभागातील भाताची शेती होणाऱ्या काही भागात जपानी मेंदूज्वराचे रुग्ण आढळले असून त्यातील काहींवर उपचार केले व काहींवर सुरू आहेत. रुग्ण दगावलेल्या भागात आरोग्य विभागाने निरीक्षण केले असून सर्वच  भागात स्थिती नियंत्रणात आहे. आरोग्य विभागाकडून सर्वच भागात सर्वेक्षण सुरू असून प्रत्येक लहान-सहान गोष्टींवर लक्ष ठेवले जात आहे.

– डॉ. मिलिंद गणवीर, सहायक संचालक, आरोग्य विभाग (हिवताप).

आजाराची लक्षणे

* ताप, अशक्तपणा

* तीव्र डोकेदुखी

* ओकारी होणे

* अर्धबेशुद्धावस्थेत जाणे

* झटके येणे