सीबीआयचे विशेष न्यायाधीश ब्रिजगोपाल हरकिशन लोया यांच्या गूढ मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका ऐकण्यास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका न्यायमूर्तीनी नकार दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण दुसरीकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.

डिसेंबर २०१४ मध्ये न्या. लोया हे एका लग्नासाठी शहरात आले असता त्यांचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला नसून खून करण्यात आल्याचे आरोप झाले. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि गुजरातमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप असलेल्या सोहराबुद्दीन चकमक खटल्याची सुनावणी लोया यांच्यासमोर सुरू होती. त्यांच्या मृत्यूनंतर सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी विनंती करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या. त्या सर्व फेटाळण्यात आल्या. पण, आता पुन्हा एक याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली असून नवीन तथ्य समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. आतापर्यंत चार न्यायमूर्तीनी याचिका ऐकण्यास नकार दिला. बुधवारी ही याचिका न्या. रवि देशपांडे आणि न्या. श्रीराम मोडम यांच्यासमक्ष सुनावणीला आली होती. पण न्या. मोडक यांनी याचिका ऐकण्यास नकार दिला.