05 March 2021

News Flash

कस्तुरबा गांधी कायम दुर्लक्षित राहिल्या

सत्याग्रह ही महात्मा गांधी यांची ओळख होती आणि ही ओळख कस्तुरबांमुळेच त्यांना मिळाली.

तुषार गांधी यांचे प्रतिपादन

नागपूर : महात्मा गांधी ऊर्फ मोहनदास गांधींचे नाव समोर आले की सारे भक्तिरसात न्हाऊन निघतात, पण मला मोहनदासला ‘महात्मा’ च्या चौकटीतून मुक्त करायचे आहे. कारण मोहनदासला महात्मा बनवण्यात योगदान असणारी कस्तुरबा गांधी कायम दुर्लक्षित राहिली. ही चूक आता सुधारायची आहे,  असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी केले.

एसजीआर नॉलेज फाऊंडेशनच्यावतीने व चिटणवीस केंद्राच्या सहकार्याने केंद्राच्या बनियन सभागृहात ‘कस्तुरबाची उल्लेखनीय जीवन गाथा’या विषयावर तुषार गांधी यांचे आज सोमवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यात त्यांनी श्रोत्यांसमोर कस्तुरबा गांधींचा जीवनपट उलगडला. कस्तुरबा गांधी कायम महात्मा गांधींच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी साथ दिली नसती  तर मोहनदास गांधी ‘महात्मा गांधी’ बनले नसते. सत्याग्रह ही महात्मा गांधी यांची ओळख होती आणि ही ओळख कस्तुरबांमुळेच त्यांना मिळाली. हे महात्मा गांधी यांनीदेखील मान्य केले. म्हणूनच ते सत्याग्रहासाठी कस्तुरबांना आपला गुरू मानत. या दुर्लक्षित कस्तुरबांवर लिखाण करण्यात आले. मात्र, कस्तुरबा एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून नाही, तर गाधींजींची पत्नी म्हणून लिहिले. महात्मा गांधींचा विदेश प्रवास आणि त्यांच्या विदेश प्रवासासाठी कस्तुरबांनी दिलेला पाठिंबा याचा प्रवास तुषार गांधी यांनी उलगडला. विदेश प्रवासासाठी कस्तुरबा गांधी यांनी त्यांचे स्त्रीधन विकले. दक्षिण अफ्रिकेतील कारागृहात असताना तिथल्या अव्यवस्थेच्या विरोधात कस्तुरबांनी  सत्याग्रह केला. हा लढा मोहनदासांची पत्नी म्हणून नाही तर कस्तुरबा म्हणूनच त्या लढल्या. गांधीजी कारागृहात असताना मुंबईतील शिवाजी उद्यानातून ‘क्विट इंडिया’चा संदेश देणाऱ्या कस्तुरबाच होत्या. आम्ही सर्वानी स्वत:ला मोहनदास ऊर्फ महात्मा करमचंद गांधी यांचे वंशज मानले आणि कस्तुरबांना कायम दुर्लक्षित ठेवले. कस्तुरबांचे योगदान आम्ही विसरलो. येणाऱ्या पिढीला कस्तुरबा माहिती असायला हव्या आणि त्यासाठी कस्तुरबांचे आयुष्य लोकांसमोर आणायचे आहे, असे तुषार गांधी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 2:21 am

Web Title: kasturba gandhi woman behind the mahatma for ever neglected says tushar gandhi
Next Stories
1 अतिक्रमण कारवाईच्या विरोधात आत्मदहनाचा प्रयत्न
2 गृहरक्षकांच्या कामांच्या दिवसांवर मर्यादा येणार
3 राज्यात ‘आरटीई’साठी नागपुरातून सर्वाधिक नोंदणी; रिक्त जागांच्या तुलनेत चारपट अर्ज
Just Now!
X