05 July 2020

News Flash

प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय ठेवा

महापौरांचे आयुक्तांना निर्देश; सर्वपक्षीय नगरसेवकांचा आयुक्तांवर रोष

महापौरांचे आयुक्तांना निर्देश; सर्वपक्षीय नगरसेवकांचा आयुक्तांवर रोष

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे महापौरांसह विरोधी व सत्तापक्षाच्या नेते वा नगरसेवकांशी कुठलाही समन्वय न ठेवता परस्पर निर्णय घेतात असा आरोप  सर्वपक्षीय नगरसेवकांनी केल्यानंतर  यापुढे करोनाशी मुकाबला करताना प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय ठेवण्यात यावा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी आयुक्तांना दिले. महापौरांनी आज गुरुवारी विविध विषयांवरील आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी नगरसेवकांचा आयुक्तांच्या एककल्ली कारभराविरुद्धचा रोष व्यक्त झाला.

करोनावरील उपाययोजनांची माहिती वेळोवेळी नगरसेवकांना  मिळत नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये चा समन्वयचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना सामोरे जाताना नगरसेवकांना अडचणी येत आहेत. करोनाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले जातात त्या बाबत आयुक्त कोणालाही विश्वासात घेत नाहीत. महापौर व विरोधी पक्षातील नेत्यांना माहिती देत नाही. नगरसेवक हे हजारो लोकांचे नेतृत्व करताता. त्यांच्या घरासमोर लोक गोळा होऊन प्रश्न विचारतात. त्यामुळे आयुक्तांनी एकतर्फी काम न करता नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करावे, अशी सूचना काँग्रेसचे नगरसेवक  प्रफुल गुडधे यांनी केली. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे,  शिवसेना गट नेते किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे यांनी आयुक्तांच्या या कार्यशैलावर नाराजी व्यक्त केली.  ज्येष्ठ नगरसेवक तथा आमदार प्रवीण दटके यांनी प्रशासनाच्या निर्णयांवर रोष व्यक्त केला. विलगीकरण केंद्रात देण्यात येणाऱ्या भोजनाविषयी अनेक तक्रारी आहेत. लोकांना जर विलगीकरण केंद्रात चांगल्या सोयी दिल्या तर लोक स्वत:हून विलगीकरण केंद्रात येण्यास तयार झाले असते, असे ते म्हणाले. या बैठकीला आयुक्त तुकाराम मुंढेंसह महापालिका अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व निर्णयांची प्रत पाठवा – महापौर

नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी असून त्यांना सोबत घ्यायला हवे.  प्रशासन जे काही करते त्याची माहिती नगरसेवकांना व्हायलाच हवी. गेल्या दोन महिन्याच्या काळात महापौरांसह कुणालाही महापालिका प्रशासनाने माहिती दिली नाही. यापुढे प्रत्येक नगरसेवकांना विश्वासात घेऊन कामे करावी. पदाधिकारी आणि प्रशासन मिळून करोनाला हद्दपार करू. पावसाळापूर्व कामे करण्यासाठी नगरसेवकांचा निधी वापरण्यास परवानगी  देण्यात यावी. आतापर्यंत प्रशासनाने घेतलेल्या सर्व निर्णयांची प्रत महापौर कार्यालयाला पाठवावी, असे निर्देश महापौरांनी दिले.

प्रत्येक निर्णयांची माहिती देईन – मुंढे

करोनाच्या बाबतीत जे काही निर्णय झाले ते जनतेच्या हितासाठी आणि शासनाच्या वेळोवेळी आलेल्या दिशानिर्देशानुसारच घेण्यात आले आहेत.  नागरिकांचे हॉटस्पॉटमधून विलगीकरण केल्यामुळे करोनाची साखळी खंडित करता आली. विलगीकरण केंद्रात भोजन पुरवण्यासाठी राधास्वामी सत्संग न्यासच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली. हे भोजन चांगल्या दर्जाचे असून याबाबत नागरिकांची कुठलीही तक्रार नाही. शासनाकडून जो निधी यासाठी आला त्याचा वापर दिशानिर्देशानुसारच करण्यात आला. इतर जो निधी खर्च करणे आवश्यक होते तो महापालिकेच्या लेखाशीर्षांतून आवश्यकतेनुसार खर्च करण्यात आला. यापुढे प्रत्येक निर्णयांची माहिती देण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

धोकादायक इमारतीत अपघात घडल्यास मालक जबाबदार

सर्वेक्षणात जी घरे किंवा इमारती अतिधोकादायक व राहण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले त्या इमारतींना तात्काळ निष्कासित करण्याबाबत नोटीस बजावून तेथील नागरिकांनी १५ दिवसात घर त्वरित खाली करावे. अन्यथा सदर व्यक्तींना घर, इमारत किंवा त्या भागातून पोलिसांकडून काढण्याची कारवाई केली जाईल. याशिवाय संरचना परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यास एखादी संस्था किंवा मालक टाळाटाळ करीत असल्यास त्यांच्यावर २५ हजार रुपये किंवा संबंधित इमारत किंवा घराचे वार्षिक मालमत्ता कराची रक्कम यापैकी जी जास्त असेल तेवढय़ा रक्कमेचा दंड ठोठावण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले. याशिवाय इमारत अथवा तिचा काही भाग आकस्मिकरित्या कोसळल्यास आवश्यक मदतीसाठी नागपूर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामधील ०७१२-२५६७०२९, २५६७७७७, ७०३०९७२२०० किंवा १०१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आवाहन  करण्यात आले.

मुखपट्टी न वापरल्यास २०० रुपये दंड

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी न लावल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, एकाच व्यक्ती तीनदा मुखपट्टी न वापरत असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश निर्गमित केले असून उद्या, शुक्रवारपासून ते अंमलात येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 1:21 am

Web Title: keep coordination between administration and public representatives nagpur mayor zws 70
Next Stories
1 .. अन् बासू चटर्जी यांनी माझी कथा निवडली!
2 जनता राजा मानत नसली तरी लोक राज्याभिषेक करवून घेतात
3 केंद्राने नव्याने अर्थसंकल्प सादर करावा
Just Now!
X