ज्येष्ठ नागरिक, अपंगांना त्रास; फलाट क्रमांक ४ आणि ५ वर शौचालय नाही

भाग १

नागपूर : रेल्वेस्थानकावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवरून प्रवासी सुविधा पुरवण्याचे धोरण असतानाही ज्येष्ठ नागरिक, अपंग नागरिकांना  इतवारी स्थानकावर गाडीपर्यंत पोहचण्यासाठी ‘रॅम्प’ नाहीत. एवढेच नव्हे तर फलाट क्रमांक ४ आणि ५ वर शौचालय देखील नसल्याने प्रवाशांना त्रासाला सामोर जावे लागत आहे.

रेल्वेच्या धोरणानुसार प्रवाशांची संख्या (फूट फॉल) बघून स्थानकाची श्रेणी ठरवली जाते.  त्यानुसार स्थानकावर प्रवासी सुविधा उपलब्ध केल्या जातात. इतवारी रेल्वेस्थानकावरून शिवनाथ एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, टाटानगर पॅसेंजर आणि रायपूर पॅसेंजर सारख्या गाडय़ा सुटतात. तसेच महाराष्ट्र एक्सप्रेस, कुर्ला- शालिमार एक्सप्रेसचे थांबे येथे आहेत.  तिरोडी, रामटेक, बिमालगोंडी पॅसेंजर आणि गोंदिया-इतवारी मेमू सुटते. शिवनाथ एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस आणि रायपूर पॅसेंजर फलाट क्रमांक पाच वरून सुटते. काही गाडय़ा कधी चार-पाच तर कधी सहावरून सुटतात. मात्र, या स्थानकावर प्राथमिक प्रवासी सुविधा देखील  नाहीत. येथील एकही फलाटावर गाडीच्या लांबीचे छत नाही. त्यामुळे पाऊस आणि उन्हाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. फलाट क्रमांक ४ आणि ५ हे इतवारी स्थानकावरील महत्त्वाचे फलाट आहेत. परंतु येथे प्रवाशांसाठी शौचालयाची व्यवस्था नाही. ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांना त्यासाठी फलाट क्रमांक सहावर रेल्वे रुळ ओलांडून यावे लागते. त्यामुळे कायम अपघाताचा धोका असतो.  कारण, एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी ‘रॅम्प’ नाही तसेच ‘बॅटरी कार’ किंवा तत्सम सुविधा नाही. मला गुडघे दुखीचा त्रास आहे. जिने चढून स्थानकाबाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे मुलाच्या मदतीने येथील रुळावरून चालत यावे लागले. येथे ‘बॅटरी कार’ सुविधा असायला हवी, असे शालिमार- कुर्ला एक्सप्रेसने आलेल्या ज्येष्ठ नागरिक कोमल विश्वास म्हणाल्या.

इंटरसिटी एक्सप्रेस सकाळी ६.४० वाजता येथून सुटते. त्यासाठी प्रवासी ६ वाजता पासून स्थानकावर येतात. परंतु शौचालयाची व्यवस्था नसल्याने असुविधा होते. महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदियाहून इतवारी येथे सकाळी १०.१५ वाजता येते. ही गाडी फलाट क्रमांक ५ किंवा ६ वर येते. कुर्ला-शालीमार दुपारी १.४० वाजता येते. शालीमार-कुर्ला दुपारी १२.३० वाजता फलाट क्रमांक ४ वर येते.

फलाट क्रमांक ३ वर रेल्वेचे कार्यालय आहे. तेथे देखील प्रवाशांसाठी शौचालयाची सुविधा नाही. या फलाटाची उंची फारच कमी आहे. प्रवाशांना गाडीत नीट चढता देखील येत नाही. या स्थानकावर मोठी समस्या म्हणजे रेल्वेगाडय़ाचे फलाट निश्चित करण्यात अधिकारी कुचराई करीत असतात. शिवनाथ, इंटरसिटी आणि रायपूर पॅसेंजर वगळता इतर गाडय़ांचे फलाट निश्चितच केलेले नाहीत. त्यामुळे गाडय़ा कधी फलाट क्रमांक सहावर तर कधी चार आणि पाचवर लावल्या जातात. त्यामुळे ऐनवेळी प्रवाशांची धावपळ होते, आता येथे हे नित्याचे झाले आहे.

‘‘ज्येष्ठ नागरिक, अपंगासाठी रॅम्प  तसेच फलाट क्रमांक ४ व ५ वर शौचालयाची सुविधा उपलब्ध करण्यात येतील.’’

– शोभना बंडोपाध्याय, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, दक्षिण- पूर्व- मध्य रेल्वे.