न्यायमूर्तीची नाराजी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवेळीही नियम पाळण्याचे निर्देश

मंगेश राऊत, लोकसत्ता

नागपूर : करोनामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी आहे. या काळात अनेक व्यवहार ऑनलाईन करण्यात येत असून न्यायपालिकेनेही अति महत्त्वाचे खटले व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऐकण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आठवडय़ातून दोन दिवस ऑनलाईन सुनावणी होत आहे. यादरम्यान एक वकील प्रकरणाच्या सुनावणीवेळी थेट बनियानवरच संगणकासमोर उभा झाला. यामुळे न्यायमूर्ती नाराज झाले व घरी बसून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद करतानाही व्यवसायाचे नियम पाळण्याची अधिसूचना न्यायालयाला प्रसिद्ध करावी लागली.

टाळेबंदीमुळे उच्च न्यायालयानेही प्रत्येक न्यायालयातील सुनावणी बंद केली. तातडीच्या प्रकरणांसाठी आठवडय़ातून मंगळवार व शुक्रवारी ऑनलाईन सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम उच्च न्यायालयात वेगवेगळया कक्षात न्यायमूर्ती व वकिलांकरिता व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर सुधारणा करून वकिलांना त्यांच्या घरून किंवा कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची मुभा दिली. त्याकरिता उच्च न्यायालयाच्या निबंधकांकडून सुनावणीच्या एक दिवसांपूर्वी संबंधित वकिलांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची लिंक, आयडी व पासवर्ड मेल करण्यात येऊ लागले.

काही दिवसांपूर्वी एका वकिलाने सकाळीच आपल्या खटल्याच्या सुनावणीसाठी लॉग इन केले. त्यानंतर आंघोळीसाठी गेले. दरम्यान, त्यांचे प्रकरण सुनावणीसाठी आले असता ते बनियानवर होते. ते त्याच अवस्थेत सुनावणीला आले. हा प्रकार बघून न्यायमूर्तीनी आक्षेप घेतला व त्यांना वकिली व्यवसायाच्या नैतिक मूल्यांचे पालन करण्याचे आदेश दिले. यानंतर दुसऱ्याच दिवशी उच्च न्यायालय निबंधक कार्यालयाने ऑनलाईन सुनावणीवेळी वकिलांचा पेहराव व इतर बाबीसंदर्भात एक अधिसूचना प्रसिद्ध केली.

कॅमेरा, स्पिकरही बंद ठेवा

ऑनलाईन सुनावणी करताना  वकिलांनी  गणवेश परिधान केलेला असावा. तसेच आपले प्रकरण सुनावणीला यायचे असल्यास इतरांच्या सुनावणीवेळी स्वत:चे संगणक किंवा लॅपटॉपचा कॅमेरा व स्पिकर बंद ठेवावा. जेणेकरून आपण समोरच्यांना दिसणार नाही किंवा आपले बोलणे इतरांना ऐकायला जाणार नाही. बनियानच्या प्रकारानंतर अनेक वकिलांनी यातून धडा घेतला आहे, हे विशेष.