प्रशासनाला विश्वास
अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्पाकडे पर्यटकांचा ओघ वाढत असतानाच शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाकडेही हळूहळू पर्यटकांची पावले वळायला लागली आहेत. याठिकाणी सुरू झालेल्या सफारीदरम्यान तृणभक्षी प्राण्यांबरोबरच बिबटय़ाचेही दर्शन आता पर्यटकांना होत आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच सफारीच्या मार्गावर बिबटय़ाने रानडुकराची शिकार केलेली पर्यटकांच्या निदर्शनास आल्यामुळे येत्या काही दिवसात पर्यटकांचा ओघ आणखी वाढेल, अशी अपेक्षा गोरेवाडा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बचाव केंद्राबरोबरच पर्यटकांसाठी काही किलोमीटर अंतरावरील सफारीचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनादरम्यान करण्यात आले. सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत आणि दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत जंगल सफारी पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे देशातील पहिली रात्रीची जंगल सफारी याठिकाणी सुरू करण्यात आली आणि पर्यटकांनीही त्याला पसंतीची पावती दिली. संध्याकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत ‘रात्र सफारी’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सफारीबरोबरच गोरेवाडय़ात काही दिवसांपूर्वीच सायकल सफारीसुद्धा सुरू करण्यात आली आणि पर्यटकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या या जंगलात हरिण, मोर, सांबर, नीलगाय यासह बिबटय़ांचाही अधिवास आहे. यासह विविध पक्ष्यांच्या प्रजाती गोरेवाडा परिसरात पाहायला मिळतात. किमान चार बिबट याठिकाणी असल्याचे गोरेवाडा प्रशासनाचे म्हणणे आहे. सफारी सुरू झाल्यानंतर अनेक पर्यटकांना याठिकाणी बिबटय़ाने दर्शन दिले आहे. गेल्या आठवडय़ातच याठिकाणी बिबटय़ाने रानडुकराची शिकार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर बिबटय़ाच्या अधिवासावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे येत्या काळात पर्यटकांची संख्या वाढेल यावर गोरेवाडा प्रशासन ठाम आहे.

आफ्रिकन सफारीची प्रतीक्षा
शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेला गोरेवाडाचा परिसर म्हणजे पक्षी निरीक्षकांचा प्रथम पसंतीचा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात येथे निसर्ग पायवाटेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यालाही पर्यटकांचा प्रतिसाद मिळाला, पण कालांतराने निसर्ग पायवाटेकडे झालेले दुर्लक्ष यामुळे पर्यटक याकडे वळेनासे झाले. दरम्यान, अधिवेशनकाळात अतिशय कमी खर्चात जंगल सफारी याठिकाणी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आली. रात्र सफारीबरोबरच सायकल सफारीचा पर्यायसुद्धा उपलब्ध करून दिल्याने पर्यटकांनी त्यालाही प्रतिसाद दिला. या प्रकल्पाच्या बृहत आराखडय़ानुसार आता पर्यटक आफ्रिकन सफारीच्या प्रतीक्षेत आहेत.