टाळेबंदीत नागपुरात अडकलेल्या मध्यप्रदेश येथील मजुरांना १६ मे रोजी एसटी बसने मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले. परततना बसमधील चालक, वाहकासह इतर एक अशा
तिघांनी धावत्या बसमध्येच मद्यपार्टी केली. त्याचे चलचित्र समाज माध्यमांत प्रसारित होताच एसटी महामंडळाने गुरुवारी चालक-वाहक अशा दोघांना निलंबित करून त्यांच्या सुरक्षा चमूकडून चौकशीचे आदेश दिले.
विशाल मेंढे (चालक) आणि पराग शेंडे (वाहक) असे निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ते नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकात कार्यरत असून १६ मे रोजी एमएच- ४०, ५५८१ क्रमांकाच्या बसवर सुमारे २२ कामगारांना सोडण्यासाठी मध्यप्रदेशच्या खवासा सीमेवर गेले होते. परतीच्या वेळी दोघांसह तिसऱ्या एका व्यक्तीने धावत्या बसमध्येच मद्य पार्टी केली. चालक चक्क बस चालवताना मद्याचे घोट घेत असल्याचे चलचित्र समाजमाध्यमात प्रसारित झाले. सुदैवाने बसमध्ये कुणीही प्रवासी नव्हते.
गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी तातडीने प्राथमिक चौकशी करत विभाग नियंत्रक कार्यालयाकडे अहवाल सादर केला. त्यावरून विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी गुरुवारी दोघांना निलंबित केले.
बसमध्ये वाहक आला कसा?
एसटीकडून मजुरांना सोडण्यासाठी बसमध्ये केवळ चालकालाच जायची परवानगी आहे. लांबचा प्रवास असल्यास त्यात दोन चालकांना पाठवले जाते. परंतु या बसमध्ये वाहक असल्याने तो त्यात पोहचला कसा, याचीही चौकशी होणार आहे. बसमध्ये असलेल्या तिसऱ्या व्यक्तीचीही माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
‘‘बसमध्ये घडलेला प्रकार गंभीर असून दोघांना तातडीने निलंबित करून सुरक्षा चमूकडून चौकशी सुरू केली आहे. ही चमू संबंधित कर्मचाऱ्यांचे उत्तर नोंदवून अहवाल सादर करेल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.’’
– नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ.