नागपूर : शहरातील करोनाचे वाढते रुग्ण ही चिंतेची बाब आहे. मात्र त्यावर टाळेबंदी हा पर्याय असू शकत नाही. हा विषय सर्वसामान्यांच्या अर्थकारणाशी निगडित असल्याने पुन्हा टाळेबंदी लावताना शंभरवेळा विचार करा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला केले आहे.

आयुक्तांच्या पुन्हा टाळेबंदीच्या संकेताच्या पार्श्वभूमीवर महापौरांचे आवाहन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. टाळेबंदीचा निर्णय काही मिनिटात होत असला तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम होतात. यापूर्वी तीन वेळा टाळेबंदी लावूनही रुग्णसंख्या वाढतच आहे. याचा अर्थ टाळेबंदीमुळे रुग्णसंख्या कमी होईल हे १०० टक्के खरे नाही. मध्यमवर्गीय, फेरीवाले, रोजंदारीवरील कामगारांची स्थिती अत्यंत वाईट आहे. यापूर्वीच्या टाळेबंदीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. पुन्हा तिच स्थिती उद्भवल्यास आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल,असे लोक संदेश पाठवत आहेत. करोनावर मात करण्यासाठी सर्वानीच एकत्रितपणे  काम करणे गरजेचे आहे. यासाठी नियम पाळणे आवश्यक आहे. टाळेबंदीची गरज नाही.  त्यामुळे आजपासून ३१ तारखेपर्यंत आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधींसोबत रस्त्यावर उतरून जनजागृती करू. त्यानंतरही साथ आटोक्यात आली नाही तर टाळेबंदीचा विचार करू, असे जोशी यांनी म्हटले आहे.

आज लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांची बैठक

नियम न पाळल्यास संचारबंदी लावण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी उद्या शुक्रवारी  लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक बोलावली आहे. बैठकीत संचारबंदीवर सांगोपांग चर्चा होणार आहे. ही बैठक दुपारी १२ वाजता महापालिकेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात होईल. या  बैठकीला खासदार, सर्व आमदार, महापालिकेतील पदाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात संदीप जोशी यांनी संबंधितांना पत्र पाठवले आहे.