शहरात ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी; कुलर, चष्मे, हार्डवेअर दुकाने सुरू होणार

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी टाळेबंदीचे नियम अंशत: शिथिल केले  असून गुरुवारपासून ऑनलाईन मद्यविक्रीसह  कुलर, चष्मे, हार्डवेअर व इतरही तत्सम  दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

मद्यविक्रीच्या परवानगीकडे नागपूरकरांचे लक्ष लागले होते. बुधवारी सायंकाळी महापालिकेने याबाबत आदेश जारी केले. त्यानुसार  करोना बाधित वस्त्या वगळता इतर ठिकाणी परवानाधारक मद्यप्रेमींना घरपोच मद्यसेवा उपलब्ध होणार आहे.नव्या आदेशानुसार, नागरी क्षेत्रातील बांधकाम सुरू करता येईल. आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर , टायर विक्री, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्सची दुकाने मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार  आणि  ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारीची दुकाने मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार या दिवशी सुरू राहतील.

ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषध आणि उपकरण), खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत, सर्व शासकीय कार्यालये ३३ टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. याव्यतिरिक्त, मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू करता येतील. प्रतिबंधित क्षेत्रात हा आदेश लागू राहणार नाही. केवळ तेथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू असतील. प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरू राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, नागरी क्षेत्रातील उद्योग, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही.  आयुक्तांनी आदेशात नमूद केल्याप्रमाणे ज्या-ज्या बाबी सुरू करण्यास मुभा दिली आहे, त्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज राहणार नाही. हा आदेश म्हणजेच परवानगी समजण्यात यावे, असेही आदेशात नमूद केले आहे. हे सुरू करताना टाळेबंदीचे सर्व नियम पाळावे लागतील. सामाजिक अंतर, मास्कचा वापर या गोष्टी बंधनकारक राहतील. टाळेबंदीच्या काळात नागपूरकरांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रशासनाला परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले. त्यामुळे टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य केल्यास लवकरच सर्व सेवा सुरू करता येतील, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

हे सुरू

*      केवळ परवानगी असणाऱ्या कामासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर.

*      एका कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करू शकतील.

*      दुचाकीवर सहप्रवाशास परवानगी नाही.

*      आवश्यक सामुग्रीचे उत्पादन जसे औषध, मेडिकल उपकरणे, त्यासाठी लागणारे साहित्य

*      नियमित सुरू ठेवण्याची आवश्यकता असणारे  उत्पादन  युनिट आणि वितरण व्यवस्था

*      आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन

*      नागरी क्षेत्रात जेथे बांधकाम स्थळांवरच कामगार उपलब्ध असतील तेथील बांधकाम

(प्रतिबंधित परिसर सोडून इतर परिसरातील नवनिर्मिती बांधकामांसाठी  वेळोवेळी परवानगी दिली जाईल.)

*      करोना -१९ च्या नियमानुसार जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने आणि बाजारसंकुल

*      प्रतिबंधित परिसरात फक्त जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजता दरम्यान सुरू राहतील.

*      इलेक्ट्रिकल सामुग्रीची दुकाने, कुलर, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार)

*      ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप

(मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार)

*      ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार)

*      ऑनलाईन मद्यविक्री

*      ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण)

*      खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत

*      सर्व शासकीय कार्यालये (३३ टक्के उपस्थितीत)

*      मान्सूनपूर्व सर्व कामे

*      २०  लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करता येईल.

हे बंद

* सर्व देशांतर्गत आणि आंतरदेशीय विमानसेवा

(मेडिकल सव्‍‌र्हिसेस आणि एअर अँबुलन्स वगळून)

* प्रवासी रेल्वेगाडय़ा (गृह मंत्रालय आणि राज्य शासनाने परवानगी दिलेल्या गाडय़ा वगळून)

* आंतरराज्यीय प्रवासी बस वाहतूक

(शासनाची परवानगी असलेल्या वगळून)

* सर्व शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग

(ऑनलाईन वर्गाना परवानगी राहील)

*  मेट्रो रेल्वे सेवा

* चित्रपट गृह , शॉपिंग मॉल, जिम्नॅशियम, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जलतरण हौद आदी

* सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच गर्दी होणारे सर्व कार्यक्रम

* सर्व धार्मिक स्थळे

* सायकल रिक्षा आणि ऑटो रिक्षा

* टॅक्सी आणि कॅब सेवा

* जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील बससेवा

* सलून आणि स्पा

* सेझ, औद्य्ोगिक वसाहती, निर्यात करणारे उद्योग.