दंत महाविद्यालयातील प्रकार

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : करोनाच्या पाश्र्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण खात्याच्या राज्यातील तिन्ही शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागात सध्या अत्यल्प रुग्ण आहेत. तरीही येथे डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जात आहे. हे कर्मचारी दिवसभर बसून  परत जातात. यामुळे विलगीकरणाच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे.

राज्यात नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद येथे तीन शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालये आहेत. तिन्ही रुग्णालयांमध्ये २०० च्या जवळपास शिक्षक, १५० पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, ३५० शिक्षके तर कर्मचारी, २०० आंतरवासिता विद्यार्थी असे एकूण सुमारे ९०० अधिकारी (डॉक्टर) कर्मचारी कार्यरत आहेत. या रुग्णालयांमध्ये राज्यात लागू असलेली संचारबंदी व करोनाची भीती बघता सध्या दाताशी संबंधित अत्यल्प रुग्ण येतात. पैकी काही वेदना असह्य़ झालेलेच असतात. त्यामुळे बहुतांश डॉक्टर व इतर कर्मचारी रुग्णालयांत रुग्ण नसल्याने सायंकाळपर्यंत थांबून परत जातात.

दुसरीकडे संचारबंदीमुळे सर्वत्र अपघाताचे रुग्ण कमी झाल्याने त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे करोनापासून वाचण्यासाठी दंतरोग तज्ज्ञांच्या महाराष्ट्र स्टेट डेंटल टिचर्स असोसिएशनने नुकताच विविध महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण खात्याच्या निदर्शनास  हा प्रकार आणला होता. तेव्हा त्यांनी शासनाला डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची विनंती केली होती. गरज भासल्यास करोनाच्या पाश्र्वभूमीवर तातडीने सेवेवर उपलब्ध होण्याची तयारीही दर्शवली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले.

‘‘वैद्यकीय शिक्षण खात्याने बैठकीत या विषयावर चर्चा केली. त्यात करोनाचा प्रादुर्भाव झाल्यास  मोठय़ा प्रमाणात रुग्णालये, आरोग्य कर्मचारी लागणार असल्याने  कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली नाही. परंतु या विषयावर पुन्हा वैद्यकीय शिक्षण खात्यातील वरिष्ठ पातळीवर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल.’’

– अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री.