नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन होणार असतानाच आमदार निवासात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. विनोद अग्रवाल असे या तरुणाचे नाव असून इमारत क्रमांक २ मधील खोली क्रमांक ४६ मध्ये त्याचा मृतदेह आढळला.

आमदार निवासातील इमारत क्रमांक २ मधील खोली क्रमांक ४६ मध्ये विनोद अग्रवाल मुक्कामास होता. आमदार रमेश लटके यांच्या स्वीय सहाय्यकांसोबत विनोद नागपूरला आला होता. मंगळवारी सकाळी विनोदचा मृतदेह खोलीत आढळला. ह्रदयविकाराच्या धक्क्याने विनोदचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, उद्यापासून नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनासाठी सुमारे अडीच हजार पोलीस नियुक्त करण्यात आले असून विधानभवन, मुख्यमंत्री निवासस्थान (रामगिरी), देवगिरी, शासकीय बंगले, मॉरिस कॉलेज टी पॉईंट, रिझव्‍‌र्ह बँक चौक, एनआयटी चौक, जयस्तंभ चौकासह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.