गाडय़ांच्या तुलनेत मनुष्यबळाचा अभाव; हजारो प्रवाशांचा रोज असुविधांशी सामना

राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर :  रेल्वेत प्रवासी चढल्यापासून तर त्यांचा प्रवास संपेपर्यंत प्रवाशांची काळजी घेण्याची जबाबदारी  तिकीट तपासणीस (टीटीई)ची आहे. परंतु अनेक रेल्वेगाडय़ांमध्ये असे तिकीट तपासणीस  दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या हक्कांच्या सुविधा देखील मिळत नसल्याचे चित्र आहे.

रेल्वे प्रवाशांची तिकीट तपासणी करणे, त्यांना त्याची जागा मिळाली की नाही, हे बघणे तसेच प्रवासादरम्यान प्रवाशांना येणाऱ्या अडीअडचणीत मदत करणे, आदी कामे तिकीट तपासणीस यांच्याकडे असतात. मात्र, तिकीट तपासणीस यांची घटती संख्या आणि रेल्वेगाडय़ांची वाढती संख्या यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. रेल्वेगाडय़ांची लांबी वाढली आहे. रेल्वेगाडय़ा १६ डब्यांपासून २४ डब्यांपर्यंतच्या झाल्या आहेत. प्रत्येक दोन डब्यांमध्ये एक टीटीई असे प्रमाण विचारात घेतल्यास १६ डब्यांच्या गाडीत ८ टीटीई आणि २४ डब्यांच्या गाडीत १२  टीटीई नियुक्त करावे लागतील. सध्या नागपूर-मुंबई दुरान्तो एक्सप्रेसमध्ये २४ टीटीई आहेत. अनेक गाडय़ांमध्ये दोन-तीनच्यावर टीटीई राहत नाहीत. त्यामुळे साहजिकच प्रत्येक डब्यात टीटीईला जाणे आणि प्रवाशांना ‘अटेंड’ करणे शक्य होत नाही, असे ऑल इंडिया ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशचे सचिव सुनील सोनारे म्हणाले.

नागपूर-पुणे एक्सप्रेस नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये डब्यानुसार पुरेसे टीटीई नाहीत. जबलपूर-अमरावती एक्सप्रेस, नागपूरमार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये एखादा-दुसरा टीटीई नियुक्त केला जातो. नागपूर विभागातून रात्रीच्यावेळी धावणाऱ्या गाडय़ांमध्ये एक किंवा दोन टीटीई असतात. आठ-नऊ वातानुकूलित डबे एक टीटीई सांभाळू शकत नाही. शयनयान डब्यात तर टीटीईच नसतो.  रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही राहत नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचे काय, असा मुद्दा उपस्थित होतो. जबलपूरसारख्या गाडीला नऊ वातानुकूलित डबे आहेत आणि तेवढेच शयनयान डबे आहेत. येथे दोन टीटीई नियुक्त असतात. नागपूर ते जबलपूर एक्सप्रेसचा रात्रीचा प्रवास असतो.

१०२ गाडय़ा आणि २४० तपासणीस

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सुमारे ३०० तिकीट तपासणीस (टीटीई) आहेत. त्यापैकी २० जण तपासणी मोहिमेच्या पथकात काम करतात. दररोज किमान ४० कर्मचारी विश्रांती आणि रजेवर असतात. उरलेल्या २४० कर्मचाऱ्यांकडे सुमारे १०२ रेल्वेगाडय़ांची जबाबदारी असते, असे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.

सेवाग्राम एक्सप्रेस २४ डब्यांची गाडी आहे. येथे सहा टीटीई नियुक्त केले जातात. नागपूर-पुणे एक्सप्रेसमध्ये सहा टीटीई, नागपूर ते जबलपूर एक्सप्रेसमध्ये तीन टीटीई आणि अमरावती ते नागपूर एक्सप्रेसमध्ये दोन टीटीई असतात. कारण, बहुतांश प्रवासी नागपूरचे असतात.

– एस.जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे.