22 January 2021

News Flash

सरकारच्या उद्योगस्नेही धोरणामुळे नक्षलवाद्यांचे लक्ष विस्थापितांकडे

केंद्रातील मोदी सरकारच्या उद्योगस्नेही धोरणामुळे नजीकच्या काळात विस्थापितांच्या संख्येत मोठी वाढ होणार असून

संग्रहित छायाचित्र

नक्षलप्रमुख गणपतीचे पत्र
‘केंद्रातील मोदी सरकारच्या उद्योगस्नेही धोरणामुळे नजीकच्या काळात विस्थापितांच्या संख्येत मोठी वाढ होणार असून, त्यांना सोबत घेऊन जनयुध्दाला सुरुवात करा,’ असा सल्ला नक्षलवाद्यांचा प्रमुख गणपतीने देशभरातील सहकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रातून दिला आहे. चळवळीची विचारधारा व रणनीती योग्य असूनसुध्दा आपले अनेक सहकारी मारले जाणे हे मोठे अपयश आहे, अशी कबुली गणपतीने या पत्रातून दिली आहे.
देशात मोदी सरकार आल्यापासून भांडवलशाहीचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. उद्योगांना प्राधान्य देण्याच्या या सरकारच्या धोरणामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. सरकारचे हेच धोरण कायम राहिले तर येत्या काळात विस्थापितांचा मोठा वर्ग देशात तयार होणार आहे. या वर्गाचे प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे असणार आहेत. त्यांना हात घालत जनयुध्दाच्या माध्यमातून सशस्त्र क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे सर्व सहकाऱ्यांनी या दृष्टीने योजना तयार कराव्यात, असे गणपतीने या पत्रात म्हटले आहे.
‘२०१५ मधील भारतीय क्रांती’ असे शीर्षक असलेल्या या पत्रात गणपतीने मोदी सरकार ‘हिंदी हिंदू हिंदूइझम’ या तत्त्वावर वाटचाल करीत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे समाजातील अनेक वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हे सरकार आल्यापासून दलितांवरील अत्याचार कमालीचे वाढले आहेत. चळवळीच्या शहरी भागातील विस्तारासाठी हे अतिशय पोषक वातावरण आहे. तेव्हा सहकाऱ्यांनी त्यासाठी नवे डावपेच आखावेत असे गणपतीने म्हटले आहे.

शहरी भागात पाठिंबा का नाही ?
जगात सध्या मंदीचे वातावरण असतानाही शहरी भागात लोकांचा पाठिंबा मिळविण्यात आपल्याला यश का आले नाही असा प्रश्न गणपतीने या पत्रातून साथीदारांना विचारला आहे. सशत्र क्रांतीसाठी जनयुध्द हेच चळवळीचे धोरण असून, यात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी रणनीती व डावपेचात बदल करा, असे गणपतीने या पत्रात सुचवले आहे. कार्यपध्दतीत बदल करताना व्यापक दृष्टिकोन ठेवा असा सल्लाही त्याने या पत्रातून शेवटी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2015 2:47 am

Web Title: maoists attention toward displaced due to government trade friendly policy
टॅग Naxalism
Next Stories
1 स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन कोषागारातून देणे सरकारच्या अंगलट
2 रिलायन्ससाठी द्रुतगती, प्रकल्पग्रस्तांना मात्र पायवाट
3 ‘पीओपी’बाबतचे महापालिकेचे दावे फोल
Just Now!
X