वीरपत्नी सुषमा निराला यांची खंत

सैनिकांना दर्जेदार साहित्य दिले जावे, बुलेटप्रूफ हेल्मेट असते तर पतीचे प्राण वाचले असते, अशी खंत शहीद ज्योतिप्रकाश निराला यांच्या पत्नी सुषमा निराला यांनी व्यक्त केली.

प्रहार जागृती संस्थेच्यावतीने सुषमा निराला यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने निराला येथे आल्या आहेत. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जवानांना उत्तम दर्जाचे साहित्य मिळावे. दहशतवाद्यांशी लढताना पतीच्या कपाळावर गोळी लागली होती, त्यांच्याकडे बुलेटप्रूफ हेल्मेट असते तर त्यांचे प्राण वाचले, असेही त्या म्हणाल्या.

शहीद ज्योतिप्रकाश हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार वर्षांची मुलगी, आईवडील आणि पाच बहिणी आहेत. एक बहीण विवाहित आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आता माझ्यावर आहे. वायुदलात नोकरी करणार आहे आणि पतीच्या इच्छेप्रमाणे मुलीला डॉक्टर करायचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

पाकिस्तानला धडा शिकवाच

पाकिस्तान वारंवार कुरापती करतो. त्यात अनेक जवान शहीद होतात. भारताने  पाकिस्तानचा एकदाचा  सोक्षमोक्ष लावला  पाहिजे, असे सुषमा निराला म्हणाल्या.

मरणोपरांत सन्मान

भारतीय वायुदलाचे गरूड कमांडो कॉरपोरेल ज्योतिप्रकाश निराला यांना गेल्या २६ जानेवारीला मरणोपरांत अशोकचक्र देऊन भारत सरकारने सन्मानित केले आहे. १८ नोव्हेंबरला त्यांच्या युनिटला बांदीपुरा जिल्ह्य़ातील चंदरगीर भागात एका घरात काही अतिरेकी लपून बसले असल्याची माहिती मिळाली. ज्योतिप्रकाश यांच्या युनिटने त्या घराला वेढा घातला. दहशतवादी पळून जाण्याचे सर्व ठिकाणे रोखून धरले. या मोहिमेत ज्योतिप्रकाश आघाडीवर होते. त्याने दोन दहशतवाद्यांना ठार केले. यावेळी दहशताद्यांच्या अंधाधूंद गोळीबारात ज्योतिप्रकाश यांना अनेक गोळ्या लागल्या. त्याही अवस्थेत त्यांनी आणखी सहा अतिरेकी ठार मारले. मात्र निराला शहीद झाले.