महापौर संदीप जोशी यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर : शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी गेल्या दोन महिन्यात विविध उपक्रम राबवले. त्याद्वारे ७० टक्के समस्या मार्गी लागल्या आहेत. विकास कामांसाठी प्रत्येकवेळी आक्रमक पवित्रा घेणे गरजेचे नाही.  संवादातून अनेक प्रश्न मार्गी लागतात. जनता दरबारासह इतर उपक्रमांतही त्याच पद्धतीने आम्ही कामे केली. त्याचे यश आता दिसायला लागले आहे, असे मत महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केले.

महापौर संदीप जोशी यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरातील विविध उद्यानात,विविध झोनमध्ये नागरिकांशी संवाद साधला. रस्ते, पाणी, मालमत्ता, पाण्याचे वाढलेलेदर, मोकळ्या कुत्र्यांची समस्या, खुले भूखंड, स्वच्छता आदी विषयांवर नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यातील ७० टक्के समस्यांचा पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्यात आल्या. २० टक्के तक्रारी अशा आहेत त्या सोडवणे शक्य नाही किंवा अन्य विभागाच्या आहेत. १० टक्के समस्या अजूनही प्रक्रियेत आहेत. महापौरांनी आमच्याशी संवाद साधून समस्या समजून घ्यावी एवढीच नागरिकांची अपेक्षा असते आणि तेच काम विविध उपक्रमातून केले जात आहे.

फुटपाथ आणि अतिक्रमण विषयावर बरीच जनजागृती करण्यात आली. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कारवाई करून दंडही वसूल केला. आता मात्र दंडासोबतच विक्रेत्यांचा मालही जप्त केला जाणार आहे. या संदर्भात टाऊन वेडिंग समिती स्थापन करण्याबाबत प्रशासनाला सांगितले आहे. काही समस्या सोडवण्यासाठी निधीची आवश्यकता असते आणि निधी आला की त्या समस्या दूर करता येते. मात्र या सर्व गोष्टींना वेळ द्यावा लागेल. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी पदाधिकाऱ्याचे प्रयत्न सुरू आहेत. तक्रारीसाठी सुरू करण्यात आलेल्या अ‍ॅपवर पाच हजारपेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या पडताळणीसाठी स्वतंत्र पाच लोकांना नियुक्त करण्यात आले असून त्या मार्गी लावल्या जात आहेत. पेट्रोल पंपावरील स्वच्छता गृह सुरू झाले आहेत. त्याबाबत अजून तक्रारी नाहीत. खाऊ गल्ली सुरू झाली असून १२ स्टॉल लागले आहेत. मात्र त्याठिकाणी काही अराजकता निर्माण करणारी टोळकी येत असतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली जाणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे शिस्तप्रिय आणि नियमाने काम करणारे अधिकारी आहेत.  शहराच्या विकासासाठी त्यांचा उपयोग होणार आहे. म्हणूनच शहरात आल्यानंतर त्यांनी घेतलेल्या काही निर्णयाचे आम्ही स्वागत केले, असेही महापौरांनी सांगितले.

बाजारासाठी १७ जागा आरक्षित

शहरात बाजारासाठी १७ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यातील काही नागपूर सुधार प्रन्यासच्या आहेत. त्या जागांची सध्याची स्थिती बघून प्रशासनाने जागा देण्याची प्रक्रिया सुरू करावी. आज प्रत्येक अनधिकृत बाजारात दलाल आहेत. या दलालांवर नियंत्रण आणले पाहिजे, असेही महापौर म्हणाले.